
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १४ जुलै
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. सुरुवातीचे तीन दिवस दक्षिण जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांना झोडपून काढले. त्यानंतर मंगळवारी व बुधवारी उत्तर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचले असून जिल्ह्यात अजूनही पूरपरिस्थिती कायम आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही.
जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या १० जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांसह छोटे नाल्यांना पूर येऊन अनेक मार्ग बंद झाले आहेत. आता जलप्रकल्पांमधून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती आणखीच बिकट होत आहे. सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या पुरामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत आहे. तसेच मेडीगड्डा बॅरेजच्या विसर्गामुळे गोदावरी नदीचे पाणीही काही गावांमध्ये शिरले आहे. अशा पूरग्रस्त भागातून बचाव पथकाने बुधवारी दोन गरोदर महिलांना बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांतील २९ गावातील ३०३३ लोकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांना एसडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. आता पावसाच्या पाण्यापेक्षाही गोदावरीच्या ब्याक वाटर मुळे काही प्रमुख नद्या आणि उपनद्या फुगल्या आहेत. त्यामुळे नद्यांच्या परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती आणखी बिघडल्याचे दिसून येते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या विसर्गामुळे आता उत्तर गडचिरोली भागातही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती गुरुवारी सुद्धा कायम असून पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद आहे. तसेच अहेरी-भामरागड, आष्टी-गोंडपिपरी, गडचिरोली- आरमोरी, आरमोरी-वैरागड, मुल-चामोर्शी मार्ग बंद झाले आहेत. आलापल्ली, भामरागड, लाहेरी बिनगुंडा राष्ट्रीय महामार्ग मार्ग बंद आहे. सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली ते नेमडा, कंबालपेठा ते टेकडा चेक आणि पर्सेवाडा-चिकेला- जाफराबाद येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्याने सदर मार्ग पूर्णतः बंद आहेत. तसेच गडचिरोली तालुक्यातील चामोर्शी-गडचिरोली, साखरा-चुरचुरा, कुंभी-चांदाळा, माडेमुल-रानमूल-चांदाळा अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्ली, देवलमारी ते अहेरी आणि धानोरा तालुक्यातील पेंढरी ते बोटेहुर मार्ग नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाले. सिरोंचा व भामरागड तालुक्यातील अनेक गावांचे मार्ग बंद झाले असून संपर्क तुटला आहे. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली शहरातील पाणी शिरलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ११ गेट २.० मीटर ने आणि २२ गेट १.५ मी ने उघडलेले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील वडसा, आरमोरी व गडचिरोलीतील गावांना सर्तकतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जीर्णा व धोकादायक इमारतीच्या मालकांना नगर परिषदेचे नोटीस
मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जीर्ण, धोकादायक इमारती कोसळण्याचा धोका आहे यामुळे शहरात जिवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगर परिषद तर्फे १२ अतिधोकादायक इमारतीचे मालकांना २४ तासाचे आत इमारती रिकाम्या करून पाडण्याचे नोटीस बजावण्यात आले आहे. तरी संबंधीत मालमत्ताधारकांनी स्वत:च्या स्तरावर इमारत न पडल्यास नगर पालिका प्रशासनातर्फे अति धोकादायक इमारत रिकामी करुन पाडण्यात येईल व येणारा खर्च संबंधिताकडून मालमत्ता कराचे थकबाकीप्रमाणे वसुल करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहे.