गडचिरोलीत नगराध्यक्षांचे पदग्रहण; आता लक्ष समित्या व स्वीकृत नगरसेवकांकडे
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ८ जानेवारी
गडचिरोली शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांनी गुरुवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. यानिमित्त नगर परिषदेच्या आवारात आयोजित पदग्रहण समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांना सन्मानयुक्त नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान केले. या समारंभास माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया, डॉ नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
पदग्रहण समारंभात नवनियुक्त नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कोणताही भेदाभेद न करता कार्य करणार, तसेच शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार, असा विश्वास व्यक्त केला. पदग्रहणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल. शहराच्या प्रगतीसाठी कायदेशीर चौकटीत राहून ठोस व दीर्घकालीन विकासकामे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्व नेत्यांनी नगराध्यक्षांना शुभेच्छा देत त्यांचा कार्यकाळ भरभराटीचा जाओ. अशा शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्षांच्या पदग्रहणासोबतच आता विविध विषय समित्यांच्या व उपाध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणूकीकडे लक्ष लागले आहे. उपाध्यक्ष पदावर भाजपच्या तीन नगरसेवकांनी दावा केला असून भाजपच्या सर्वच निर्वाचित नगरसेवकांनी सभापतीपदी आपली वर्णी लागावी यासाठी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे इथे ही रुसवे फुगवे समोर येणार आहेत. गडचिरोली नगर परिषदेत तीन स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. यात एक विरोधी पक्षाचा देणे कायद्याने बंधनकारक आहे. येथे भाजपकडून दोन सदस्य निवडले जातील. नगराध्यक्षांचे वडील भांडेकर व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार यांची नावे प्राधान्यक्रमाने चर्चेत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता ही निवडणूक रंगतदार होणार आहे.


