मुलगी भाग्यश्री हिला विरोधात लढवणे ही धर्मराव आत्राम यांची राजकीय खेळी ?
स्वतःची आमदारकी राखण्यासाठी मुलीचा बळी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ११ सप्टेंबर
मागील १२ वर्षांपासुन गडचिरोली जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात असलेल्या मुलीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पाठवून महायुती आणि महाविकास आघाडीत पिता – पुत्रीची लढत दाखवून स्वतःची पोळी शेकुन घेणे. ही धर्मराव आत्राम यांची स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात धर्मराव यांचे, मुलगी भाग्यश्री, जावई आणि त्यांची इतर मुलं, मुली यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे समजते.
प्रत्यक्षात विवाद दिसून येतो तो सुन विरुद्ध दोन्ही नणंदा. आत्राम घराण्याचा वारसा पुढे चालवण्याचा तसा हक्क मुलाचा आणि सुनेचा. परंतु धर्मरावांनी उच्च शिक्षित सुनेला राजकारणापासून दूर ठेऊन आरंभी मोठ्या मुलीला आणि नंतर छोट्या मुलीला पुढे आणले. भाग्यश्री हलगेकर (आत्राम ) यांच्या विवाहानंतर धर्मराव यांचे जावई ऋतूराज हलगेकर हे एकमेव सल्लागार होते. याच दरम्यान विधानसभा २०१९ पूर्वी या वाड्यात मोठा विवाद झाल्याचे सर्वश्रुत आहे. वादाचे कारण सुन आणि मोठी नणंद यांच्या राजकीय आणि इतर अधिकारांचे होते, असे त्यावेळी सांगण्यात येत होते.
तसा २०१२ पासून भाग्यश्री आत्राम यांना राजकिय वारसा मिळाला त्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर २०१४ ची विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकीटावर गडचिरोली विधानसभेतून लढल्या याचवेळी धर्मराव आत्राम हे अहेरी तून लढले आणि दोघांचाही पराभव झाला. त्यानंतर त्या जिल्हा परिषदेत सक्रिय राहिल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धर्मराव यांना पुन्हा संधी मिळाली आणि ते आमदार झाले. पुढे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून बाहेर पडून भाजप सोबत आल्यानंतर ते मंत्री झाले. त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या व ते लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे स्वप्न पाहत भाग्यश्री साठी अहेरी व छोटी मुलगी तनुश्री साठी गडचिरोली विधानसभा असे स्वप्नरंजन करीत राहिले. त्यातही भाजपच्या खेळीत फसले आणि पुन्हा अहेरी विधानसभा या मुळ ठिकाणावर आले. परिणामी भाग्यश्रीचे आमदार म्हणून लढण्याचे स्वप्न भंगले. तरीही सुरजागडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आघाडीवर कमजोर पडता कामा नये आणि धर्मराव विरोधात महाविकास आघाडीतून कोणत्याही परिस्थितीत कांग्रेसला अहेरीची सीट जाऊ नये यासाठी घरात वादविवादाचा फार्स उभा करीत भाग्यश्रीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा घाट घातला जात आहे. एकुणच काय तर आपली निवडणूक सोपी करण्यासाठी धर्मराव आत्राम कुटुंबियांकडून रचले जात असलेले हे कुंभाड असल्याचे दिसून येते.
सुरजागड खाण आणि त्यापोटी सुरू झालेल्या आर्थिक चकमकी यातून धर्मराव आणि जावई यांच्यात काही काळ काही अंशी दुरावा निर्माण झाला होता. परंतु तोही कदाचित वादाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी झाला असावा. एकुणच धर्मराव आत्राम यांनी रणनीतीक षडयंत्र रचून ही खेळी केली असल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांचे धर्मराव आत्राम यांच्या कार्यपद्धतीकडे जर नीट लक्ष दिले तर दिवसेंदिवस त्यांची प्रतिमा खालावत चालली आहे. मंत्री पदा नंतर केवळ “आने दो ” की बात, सुरजागड इस्पातचे फेक भूमीपूजन, जमीन, जी त्यांची नाहीच ती दान दिल्याची खोटारडी घोषणा यातून यातून धर्मराव आत्राम यांची प्रतिमा अधिकच डागाळली आहे. सर्व स्तरातून आलेल्या सर्वेक्षणात अहेरी तून धर्मराव पडणार हे वास्तव समोर आल्याने मुलीचा बळी घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन महाविकास आघाडीचे तिकीट घेऊन पित्याच्या विरोधात डमी उमेदवार म्हणून लढायचे आणि पुन्हा एकदा आपली आमदारकी काढायची. असा हा फार मोठा होरा आहे. अहेरीतून काँग्रेसच्या उमेदवाराला लढतीतून बाहेर ठेवण्याची ही फार मोठी व्यूहरचना आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. अजय कंकडालवार यांनी कांग्रेस प्रवेशानंतर ज्या पद्धतीने अहेरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढवली, अम्ब्रीशरावांनी निवडणूक लढण्याचा चंग बांधला आहे. दिपक आत्राम यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे धर्मराव आत्राम यांची फार मोठी अडचण वाढली आहे. त्यांना कांग्रेस आणि अम्ब्रीश आत्राम यांचे समोर लढून विजयश्री खेचून आणने हे जवळजवळ अशक्यप्राय आहे. मुलगी तनुश्री आत्राम हीसुद्धा गडचिरोली विधानसभेसाठी पूर्ण तयारीनिशी कामाला लागली आहे. ती माघार घेणार नाही. त्यामुळे यावरील ” गॅरंटीड इलाज” म्हणून भाग्यश्री आत्राम यांचा बळी देणे हा होय असे मानले जात आहे.