खाण विरोधी भूमिका कांग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तारणार काय?
जिल्ह्यात चर्चांना उधाण
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.२८ ऑक्टोबर
एकेकाळी सुरजागड खाणीचे समर्थन करणारे कांग्रेसचे विधानसभेचे विद्यमान गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत सोमवारी आयोजित पक्ष प्रवेश मेळाव्यात बोलताना खाणींचा विरोध केला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचेसह अन्य काहींना मलाई खाणारे आणि दलाल म्हटले. वडेट्टीवारांची अचानक बदललेली खाणी संदर्भातील भुमिका ही गडचिरोलीच्या राजकीय पटलावर अनेकांना अचंबित करणारी ठरली आहे. वडेट्टीवार आणि कांग्रेसची ही बदललेली खाण विरोधी भूमिका कांग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तारणार काय? अशी चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे.
या मेळाव्यात वडेट्टीवार व कांग्रेसचे प्रांताध्यक्ष सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “गडचिरोलीचे पालकमंत्री” पदावरून अत्यंत आक्रमक टीका केली. खाणीचा मलिदा खाण्यासाठी मुख्यमंत्री पालकमंत्री झाल्याचे शरसंधान केले. कांग्रेसचे प्रांताध्यक्ष सपकाळ यांनीसुद्धा सुरजागडची रोजची आवक ३५० कोटी असून त्यातला हिस्सा मागण्यासाठी फडणवीस गडचिरोलीत येतात. अशी जाहीर टीका केली.
उल्लेखनीय आहे की विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रचारादरम्यान नाग विदर्भ आंदोलन समितीच्या बॅनरवर अपक्ष असलेले भाजपचे नेते अशी ओळख असलेले उमेदवार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी सुद्धा खाण विरोधी भूमिका घेत संबंधितांना टार्गेट केले होते. त्यावेळी मात्र कांग्रेस खाणी संदर्भात कोणतीही भूमिका न घेता मुग गिळून गप्प राहिली. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना त्यांच्या खाण विरोधी भूमिकेचा मोठा फटका बसला होता.
गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र निहाय जर विचार केला तर अहेरीत विद्यमान आमदार धर्मराव आत्राम यांचे प्राबल्य आहे. पाठोपाठ भाजप व नंतर कांग्रेस अशी स्थिती आहे. आणि धर्मराव व भाजप हे खाण समर्थक मानले जातात. अम्ब्रीशराव हे मागिल अनुभवातून धडा घेतील असे मानले जाते. या मतदारसंघात जिपच्या १९ जागा आहेत. गडचिरोली विधानसभेतही जिपच्या १८ जागा आहेत. त्यांपैकी अनेक ठिकाणी भाजपचे वर्चस्व दिसते. तर आरमोरी विधानसभेत जिपच्या १४ जागा आहेत. या विधानसभेतून यद्यपि कांग्रेसचे आमदार असले तरी या क्षेत्रात संमिश्र अशी स्थिती आहे. कांग्रेस मधील अनेक नेते बाहेर किंवा मंचावर जरी खाण विरोधी भूमिका मांडताना दिसत असले तरी आतून ते खाण समर्थकच मानले जातात . अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांग्रेसने जाहीरपणे घेतलेल्या खाण विरोधी भूमिकेचा फायदा की तोटा होईल याकडे गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे



