संपादकीय

आदिवासींचे चक्काजाम आंदोलनात माजी आमदार डॉ. उसेंडींची खेळी यशस्वी….पण डाग लागलाच!

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २ आक्टोंबर 

संपादकीय // @ हेमंत डोर्लीकर, संपादक पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली 

धनगरांच्या आदिवासी समावेशाविरोधात गडचिरोलीत आयोजित चक्काजाम आंदोलनातील लोक बहुसंख्येने डॉ. उसेंडींच्या बाजूने आणि विद्यमान आमदार डॉ. होळी वा भाजपच्या विरोधात असल्याचे वातावरण निर्माण करण्यात उसेंडींना यश आल्याचे दिसून येत होते. संपूर्ण आंदोलनात त्यांचेवर फारशी टीका झाली नाही. आंदोलन हे सरकार विरोधात असल्याने कदाचित उसेंडी आंदोलकांच्या टीकेचे लक्ष्य झाले नाहीत. असेही म्हणायला हरकत नाही. परंतू एकुणच आंदोलन हे उसेंडींनी घडवून आणण्याचीही चर्चा गांधी चौकात होती. आंदोलकांच्या टीकेचे धनी केवळ आणि केवळ आमदार डॉ. देवराव होळी हेच असल्याचे पावलोपावली दिसून येत होते. वास्तविक पाहता आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे जरी सांगितले जात असले तरी जिल्ह्यातील तीनही आदिवासी आमदार आणि खासदार आंदोलन स्थळी आल्याशिवाय चक्काजाम समाप्त करणार नाही. अशा राणा भीमदेवी गर्जना करणाऱ्या आंदोलनातील प्रमुख नेत्यांनी उर्वरित दोन आमदार आणि खासदार आंदोलन स्थळी आले नसतानाही चक्काजाम समाप्त केला. असे करताना अहेरीचे आमदार आणि मंत्री धर्मराव आत्राम, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे आणि खासदार अशोक नेते यांचे विरोधात आंदोलकांचा सुर मवाळ होता. त्यांचे विरोधात फारशी टीका झाली नाही. संपूर्ण आंदोलनात डॉ. होळी हेच केवळ आंदोलकांच्या निशाण्यावर होते, असे कां?. असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

रविवारी गांधी चौकात एकत्रित झालेले आंदोलक आणि कार्यकर्ते कोण होते. याचा जर बारकाईने अभ्यास केला. तर हे लक्षात येईल की, यातील मोठ्या प्रमाणावर नेते हे गडचिरोली विधानसभेतील पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना लीड करणारे होते. आदिवासी विकास युवा परिषद, आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली,हसली, शिवणी, आदिवासी गोंडवाना गोटुल समिती नवेगाव, मुरखळा, आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन गडचिरोली, कै.बाबूरावजी मडावी स्मारक समिती गडचिरोली,गोटूल सेना गडचिरोली वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके स्मारक समिती गडचिरोली, जस्टीस फॉर मुव्हमेंट गडचिरोली, जेडीयू, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आणि पोलीस ब्वाइज असोसिएशन यांच्या सहभागातून हे चक्काजाम आंदोलन  केले गेले. यात आयोजकांच्या यादीतच डॉ. होळींचा विरोध आणि उसेंडींची पाठराखण स्पष्ट दिसून येते. असे असताना डॉ. होळी आपल्या विरोधातील शिव्याशापांची लाखोली ऐकत पूर्णवेळ आंदोलनात सहभागी झाले. एवढेच नव्हे तर धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश केल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असेही स्पष्ट केले. एकूणच हे आंदोलन खरोखरच धनगरांच्या आदिवासी समावेशाविरोधातील एल्गार होता की धनगरांच्या नावावर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून आमदार होळींची आदिवासींसमोर नाचक्की घडवून आणन्याची त्यांचें प्रमुख विरोधक माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांची खेळी होती असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

उल्लेखनीय आहे की मागील वर्षभरापासून कांग्रेसतर्फे डॉ. नामदेव किरसान हे पायाला चक्र बांधल्यासारखे लोकसभा क्षेत्राचा दौरा करीत आहेत. तर डॉ.नामदेव उसेंडी घरुनच लोकसभेची खेळी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांकडून डॉ.ऊसेंडींनी लोकसभेऐवजी गडचिरोली विधानसभा लढवावी. त्यासाठी तयारीला लागावे असा सल्ला दिला आणि त्यांनीही तो स्वीकारला. त्यासाठी धनगर विरोधी आंदोलनाच्या नावावर डॉ. होळीच्या विरोधात असंतोष माजविण्याचा प्रयत्न केला?. 

दरम्यान माजी आमदार डॉ . उसेंडींच्या भाषणातून भाजप आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकार विरोधातील वक्तव्यानंतर आंदोलकांनी, “हे जरी खरे असले तरी हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. आणि भाजपचा विरोध म्हणजे कॉग्रेसचे समर्थन असे डॉ.उसेंडी यांनी समजू नये”. आणि आंदोलनाला राजकारणाशी जोडू नये असा तिथेच खुलासा केला. त्यामुळे उसेंडींची खेळी काही अंशी यशस्वी झाली तरी त्यावर डाग तो लागलाच असे म्हणावयास काही हरकत नाही.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!