विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा – राजे अंब्रीशराव आत्राम
५३ वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण सोहळ्याचा थाटात समारोप

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ जानेवारी
आज देशात नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक नवनवीन बदल हे फक्त विज्ञानामुळे शक्य होत आहे. विज्ञान प्रदर्शनाचे माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने शाळांनी उपक्रम राबवावे अशी भावना माजी मंत्री राजे अंब्रीशराव आत्राम त्यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच विद्यार्थ्यासाठी संशोधन व प्रयोग करण्यासाठी आधुनिक विज्ञान प्रयोग शाळेची गरज आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांचे कडून ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न करून ते मिळवून घेणार अशी ग्वाही यावेळी राजे अम्ब्रीशराव यांनी दिली.
अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे ५३ व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते विविध गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागामध्ये ४६ व माध्यमिक मध्ये ५१ असे एकूण ९७ बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती प्रदर्शनात ठेवलेल्या होत्या . विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आणि संशोधनात्मक प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्ह्यातून प्राथमिक गटात दिव्यांगांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा, आदिवासी गटात पार्वताबाई विद्यालय कोरची यांनी बाजी मारली. तसेच प्राथमिकच्या सर्वसाधारण गटांमध्ये प्रथम प्राविण्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आष्टीला तर द्वितीय पारितोषिक वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी सह तृतीय मध्ये हैदरभाई इंटरनॅशनल स्कूल्स मुलचेरा यांनी प्राविण्य मिळवून प्रशस्तीपत्र व पदकाचे मानकरी ठरले आहेत. माध्यमिक गटामध्ये दिव्यांगांमध्ये भगवंतराव हायस्कूल अहेरी, आदिवासी गटात भगवंतराव अनुदानित आश्रम शाळा गुंडापल्ली यांनी बाजी मारली तर सर्वसाधारण गटांमध्ये प्रथम क्रमांक नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा, द्वितीय मध्ये महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज, तृतीय पारितोषिक भगवंतराव आश्रमशाळा गट्टा यांनी प्राविण्य घेतले.
कार्यक्रमाला माजी आमदार दीपक आत्राम, शिक्षणाधिकारी माध्यमिक भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बच्चाव, वैभव बारेकर, उपशिक्षणाधिकारी गेडाम, परसा, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार, नाकाडे व शिक्षण क्षेत्रातील सर्व वरिष्ठ व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


