विशेष वृतान्त

गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे अहेरीत करावे लागले शवविच्छेदन

कुटूंबियांना हकनाहक त्रास

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २ जानेवारी 

एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला या गावातील आशा संतोष किरंगे (वय २५), या तरुण गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन स्थानिक तज्ञ डॉक्टरांअभावी ३० किमी दूर अहेरी येथे करावे लागले. यामुळे त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

प्राथमिक माहितीनुसार आशा किरंगे या ७ ते ८ महिन्यांच्या गर्भवती होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला अचानक तीव्र सूज येऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने हेडरी येथील काली अंमल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही. परिणामी मृतदेह अहेरी येथील रुग्णालयात हलविण्यात आला.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या अपुऱ्या सुविधा आणि डॉक्टरांच्या अनुपलब्धतेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
एकीकडे गडचिरोली जिल्हा दुषणांकडून भुषणांकडे वाटचाल करीत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या प्रत्येक भाषणात जाहीरपणे सांगत असतात. परंतु येथे उक्ती आणि कृती यात महदांतर दिसून येत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

स्त्री रोग व बाल रोग तज्ञ नसल्यामुळे शवविच्छेदन अहेरी येथे करावे लागले
एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग व बाल रोग तज्ञ नसल्यामुळे आणि गर्भवती महिलेचा गर्भातील बाळासह मृत्यू झाला असेल तर असे शवविच्छेदन हे स्त्री रोग व बाल रोग तज्ञ असे दोन वैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक असल्याने सदर मृतदेह शवविच्छेदन करिता अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
डॉ. तुपेश उईके, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!