महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत डॉक्टर मनीष मेश्राम यांची क्लास वन स्पेशल कॅडर पदी निवड

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ४ मार्च
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत निवड यादीमध्ये सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉक्टर मनीष नामदेवराव मेश्राम यांची क्लास वन स्पेशल कॅडर, विशेषतज्ञ संवर्ग श्वसन विकार तज्ञ या पदावर निवड झाली आहे.
सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे डीएमएचपी नोडल ऑफिसर व मानसिक रोग तज्ञाचे प्रभारी, कोविड टास्क फोर्स मेंबर, किमोथेरपी प्रशिक्षित फिजिशियन (टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई) अशा विविध पदांवर ते कार्यरत होते . सध्या, उपचाराला दाद न देणारा क्षयरोग एम डी आर टी बी नोडल ऑफिसर गडचिरोली या पदावर ते कार्यरत आहेत.
त्यांनी २००६ या वर्षात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा, २००७ या वर्षी ग्रामीण रुग्णालय भामरागड गडचिरोली,
२००८ ला मसीना हॉस्पिटल भयंकळा मुंबई कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन मुंबई
२००९ ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, २०१० या वर्षात बीएमसी सिद्धार्थ हॉस्पिटल गोरेगाव मुंबई, २०११ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, २०१४ ते १७ पर्यंत डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड आणि २०१७ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सर्व प्रकारच्या मेडिकल ,श्वसन विभाग, मनोचिकित्सा ,व्यसनाधीनता, कर्करोग (किमोथेरपी) इत्यादी पदांवर काम केले आहे.
अथक परिश्रमातून रुग्णसेवा हा त्यांचा ध्यास आहे. प्रचंड अभ्यास आणि आकलनशक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात अहोरात्र पायाला भिंगरी बांधून तीनही माळ्यावर रुग्णसेवेसाठी झपाटलेला डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. आजारी माणूस आणि त्यांचे नातेवाईक यांना आपल्या मधूर वाणीतून सहज समजेल असे निदान सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे. असे रुग्णसेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॉक्टर मनीष मेश्राम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत परिक्षा देऊन त्यात मोठे यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


