लॉयड्स मेटल्स च्या माध्यमातून कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये हत्ती- माहुत प्रशिक्षण
हत्ती शिबिरातील पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांच्या दर्ज्जोनतीसाठी कंपनीकडून थेट ४० लाख खर्च होणार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २७ फेब्रुवारी
कमलापूर हत्ती कॅम्प येथे १७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हत्ती व माहूत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमाचा उद्देश हत्ती आणि माहुत यांच्या कौशल्य वृद्धी सोबत त्यांच्यातील समन्वय, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविणे हा होता. हा प्रशिक्षण कार्यक्रम लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट पर्यावरणीय दायीत्व उपक्रमांतर्गत राबविण्यात आला. त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला.
प्रशिक्षण तज्ज्ञ माहुत आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेश यांनी दिले, जे टेप्पाकडू एलिफंट कॅम्प मुदूमलाई टाइगर रिझर्व्ह (तामिळनाडू) येथून आले होते. प्रशिक्षणामध्ये आदेश देण्याची पद्धत, हत्तींची वर्तणूक प्रतिसाद, कंडीशनिंग तंत्र, मानवी पद्धतीने हाताळणी, शिस्त, वर्तणूक व्यवस्थापन तसेच आरोग्य तपासणी आणि निरीक्षण यांवर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रम महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि एल एम ई एल चे सल्लागार महीप गुप्ता यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला.

सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, एल एम ई एल चे महाव्यवस्थापक अमिताभ मलिक आणि एल एम ई एल चे उपव्यवस्थापक (वन्यजीव) कुमार स्वामी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन कमलापूरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर गौरेश गौतम गडमाडे, प्रोबेशनरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिरुद्ध माने आणि डॉ. नागेश्वर रामलाल चौहान यांच्या हस्ते वन विभागातील अधिकारी तसेच एल एम ई एल चे प्रतिनिधी निक्षेपन गौड यांच्या समन्वयाने करण्यात आले.
कमलापूर हत्ती शिबीराच्या विकासासाठी एल एम ई एल कडून सिरोंचा येथील वन विभागीय अधिकाऱ्यांना विकासकामांसाठी ३४.५३ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. याशिवाय शिबिरातील पायाभूत सुविधा आणि इतर सोयी सुविधांच्या दर्ज्जोनती साठी कंपनीकडून थेट ४० लाख खर्च करण्यात येणार आहेत, ज्यामुळे या ठिकाणी इको-टुरिझमलाही चालना मिळणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कमलापूर रेंज कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक विष्णु वर्धन रेड्डी रेंज फॉरेस्ट ऑफिसर गौतम गडमाडे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिरुद्ध माने तसेच वन विभागाचे कर्मचारी आणि शिबिरातील कर्मचारी उपस्थित होते.


