जल, जंगल, जमीन संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींची राजकारण्यांकडून दिशाभूल होती काय?
ग्रामसभांचे नेतेही राजकारण्यांच्या फसवणूकीचे बळी ठरताहेत!

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ८ मार्च
नुकतीच ६ फेब्रुवारी रोजी इटापली तालुक्यातील गट्टा, गर्देवाडा या परिसरातील दमकोडी अर्थात दमकोंडवाही या पहाडी वरील आदिवासी देवता कोडपेन व रावपेन या महादेवाच्या अंशाची पुजा संपन्न झाली. या पूजेत दमकोडी अर्थात दमकोंडवाही या सध्याच्या रिठ गावातील नागरिक जे सध्या गर्देवाडा ईथे स्थाईक झालेले आहेत त्यांचे सह गट्टा पारंपरिक इलाका पट्टीमधील १५ ते २० गावातील पारंपरिक प्रमुख जसे गाव पुजारी,भूमिया,गायता, गावपाटील, कोतवाल आणि काही ग्रामस्थ असे साधारणतः १५० ते २०० आदिवासी बंधु पुजेकरीता एकत्र आले होते. या ठिकाणी ग्रामसभांची कोणतीही बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. आणि या पुजेच्या ठिकाणी एकत्रित झालेल्यांनी खाणीच्या संदर्भात कोणतीही चर्चा केली नाही. किंवा खाण विरोधी आंदोलनाचा साधा उल्लेखही केला नाही. या ठिकाणी झालेल्या चर्चेत जल जंगल आणि जमीन संरक्षण व संवर्धन, तेंदुपत्ता तोडणे, बांबुचे योग्य दर ठरवणे. ग्रामसभेच्या माध्यमातून होणाऱ्या गोष्टी पारदर्शक आणि कुणालाही व्यक्तीगत लाभाच्या ठरु नयेत अशा औपचारिक चर्चा झाल्या.
साधारणपणे साडेतीन वाजताच्या सुमारास महा परिवारातील प्रमुखांच्या हस्ते पुजा संपन्न होऊन बळी देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बळीचा प्रसाद बनवून उपस्थितांच्या जेवणासाठी गर्देवाडा येथे सर्वांनी प्रस्थान केले. जेवणासाठी वेळ असल्याने आलेली मंडळींनी एकत्र बसुन आदिवासींच्या पारंपरिक विषयावर चर्चा सुरू केली. यात प्रामुख्याने आदिवासींमधील दंड आकरणी धोरण हे महाराष्ट्र व छत्तीसगड मध्ये समान असावे यावर आधारित होती. यात कुठेही खाणींचा किंवा आंदोलनाचा विषय चर्चेला आला नाही.
या पुजेच्या कार्यक्रमाला माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, शेकापचे जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मी स्वतः पत्रकार हेमंत डोर्लीकर, एटापल्ली वरुन सीपीआय चे सचिन मोतकुरवार, आणि सुरज जक्कनवार उपस्थित होतो.
आदिवासी आणि ग्रामसभांना पुढे करुन जिल्ह्यातील खाणींच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले सर्व नेते नंतर खाणी या जिल्हा विकासाचा आधारस्तंभ आहेत असे घुमजाव केले. आणि आदिवासींच्या जल, जंगल, जमीन बचाओ या विषयापासून दुर गेले. त्यामुळे पुन्हा एकदा जल, जंगल, जमीनीच्या मुद्यावरुन आदिवासींची फसवणूक किंवा दिशाभूल होती काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आम्ही सुरजागडच्या पुजेच्या पार्श्वभूमीवर दमकोडी ची पुजा कशी होते यात काही वेगळेपणा आहे काय. या उत्सुकतेपोटी तिथे गेलो होतो. चर्चेदरम्यान लावलेल्या खुर्च्यांवर आम्ही पाहुण्यांसारखे श्रोते म्हणून बसलो होतो. परत निघण्याच्या आधी एक सन्मान म्हणून कॉ. अमोल मारकवार यांनी मार्गदर्शन करावे म्हणून संधी दिली. यात मारकवारांनी त्यांच्या राजकीय संघटनेबद्दल सांगतांनाच त्यांची खाणविरोधी भूमिका मांडली. या भूमिकेवर उपस्थितांमधून काही नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा आल्या. त्यात पुजेच्या दरम्यान अशा भूमिका मांडू नये. पुजेच्या कार्यक्रमाला पारंपरिक कार्यक्रमाचेच स्वरुप असावे. एकाने तर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत, आता कम्युनिस्टच आदिवासींची लढाई लढणार आहेत काय असा उपरोधिक प्रश्नही केला?. पुज ही फक्त आणि फक्त देवतांची पूजाच होती. तिथे कोणतीही अधिकृत ग्रामसभांची बैठकच झाली नाही.कसलाही ठराव घेण्यात आला नाही. त्यामुळे कॉ. अमोल मारकवारांनी जो संधीसाधूपणा करीत स्वतःचे भाषण स्वतःच माध्यमांपर्यंत प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाठवून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करीत आदिवासींची दिशाभूल केलेली आहे.
या पूर्वीही आदिवासी आणि पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना हाताशी घेऊन त्यांच्या हक्काच्या नावावर तोडगट्टा सारख्या छत्तीसगड सीमेवरील गावात दीडशेहून अधिक दिवस आंदोलन केले. त्यात ज्या खाणीचा प्रशासनीक चौकटीत प्रस्तावित असा उल्लेखच नाही अशा दमकोंडवाही खाण विरोधी आंदोलन केले गेले.आणि ज्या दिवशी पोलीसांनी ते आंदोलन चिरडून टाकले त्या दिवशी आंदोलनातील एड् लालसू नागोटी सारखे नेते आंदोलन स्थळापासून हजार किमी अंतरावर होते.आणि टीका झाल्यानंतर आमचा कार्यक्रम आधीच ठरला असल्याचे सांगितले गेले. या आंदोलनात सामान्य आदिवासींची घोर फसवणूक झाली. भलत्यांवरच गुन्हे दाखल झाले. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
आणि म्हणून जल, जंगल, जमीनीच्या नावावर आदिवासींची दिशाभूल केली जाते काय? असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेला आहे. याची गंभीर दखल ग्रामसभांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.