व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाचे टाईम ट्रॅव्हल ! २० फेब्रुवारीच्या आत माहिती द्या, अशा आदेशाचे पत्रच २४ फेब्रुवारीला काढले
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ६ मार्च
प्रशासकीय कामात तत्परता आणि अचूकता असणे अपेक्षित असताना, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने (नागपूर विभाग) एक अजबच पराक्रम केला आहे. ज्या माहिती सादरीकरणासाठी २० फेब्रुवारीची मुदत देण्यात आली होती, त्यासंबंधीचे आदेशच चक्क २४ फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. या ”टाईम ट्रॅव्हल” करणाऱ्या पत्रामुळे आता माहिती द्यायची कशी, अशा पेचात कनिष्ठ कर्मचारी अडकले असून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील अनेक संस्थांमध्ये वर्ग-१ आणि वर्ग-२ ची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, राजीनामे किंवा निधनामुळे रिक्त झालेल्या या जागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याबाबत २९ डिसेंबर २०२५ रोजी आदेश काढण्यात आले होते. यानुसार, अनेक संस्था प्रमुखांना ”आय.एम.सी.” च्या सदस्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश होते. मात्र, अनेक ठिकाणी हा कार्यभार अद्याप स्वीकारला नसल्याचे समोर आल्यावर, सहसंचालक कार्यालयाने याची माहिती मागवली. मेख अशी की, ही माहिती २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश पत्रात दिले आहेत, मात्र हे पत्रच २४ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वाक्षरी होऊन निर्गमित झाले आहे.
खातरजमा न करताच अधिकारी स्वाक्षरी करतात !
मुदत संपल्यानंतर चार दिवसांनी आदेश हाती पडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. “तारीख निघून गेल्यावर माहिती कशी द्यायची?” असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकारामुळे संबंधित अधिकारी पत्रातील मजकूर आणि तारखांची खातरजमा न करताच स्वाक्षऱ्या करतात काय, अशी खोचक टीका आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
नियमांना हरताळ
शासकीय कामात पारदर्शकता असावी असा नियम असताना, सहसंचालक कार्यालयाने अशा प्रकारे पत्राचा खेळ मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या तांत्रिक चुकीमुळे आता या पत्राला पुन्हा सुधारीत स्वरूप द्यावे लागणार की कर्मचारी ”भूतकाळात” जाऊन माहिती सादर करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


