संपादकीय

संवेदनाहीनतेची पराकाष्ठा

संपादकीय

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १२ मे

संपादकीय । हेमंत डोर्लीकर 

अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेला ६० तास उलटूनही राजकीय, सामाजिक धुरिणांकडून, रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी घसा फाटेपर्यंत बोंबलणाऱ्या महिला संघटना यांचेकडून साधी निषेधाची, सहानुभूतीची, पिडीतेला न्याय मिळावा यासाठी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. समाजधुरिणांची आणि राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची, महिला संघटनांची यापेक्षा अधिक स्वार्थी, दळभद्री, षंढपणाची, त्यांच्या नालायकपणाची काळीकुट्ट प्रतिमा जिल्ह्यातील नागरिकांसमोर आली आहे.

याचं काय कारण असू शकतं? पिडीता आदिवासी समाजातील आहे म्हणून? आरोपी हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित आहेत म्हणून? रसुखदारांची पोरं आहेत म्हणून? की अशा सगळ्याच गोष्टींमुळे?
गडचिरोली जिल्ह्यात मागिल आठवड्यात वडसा येथे एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर दोन शिक्षक आणि एक न्यायालयीन कर्मचारी हे मागिल पाच वर्षांपासून अप्राकृतिक बलात्कार करीत असल्याची घटना समोर आली. गडचिरोली शहरात एका नातेवाईकानेच मजूरी करुन उदरनिर्वाह चालवत असलेल्या महिलेवर बलात्कार केला, चामोर्शी येथे मजूरीचे काम आटोपून सायंकाळी घराकडे येत असलेल्या महिलेवर परिसरातील एका व्यक्तीने अतिप्रसंग केला, तर १० जून रोजी आलापल्ली येथे स्वतःला हिंदूत्ववादी संघटनांचे सदस्य म्हणून मिरवून घेणाऱ्या दोन नारधमांनी आदिवासी विद्यार्थीनीवर बलात्कार केला. या सर्व घटनांवर स्वतःला सभ्य म्हणवून घेणाऱ्या समाजाला याकडे बघण्यासही सवड मिळत नाही.
आश्चर्य याचे वाटते की घटनास्थळाच्या केंद्र स्थळी बसलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना, आमदारांना किंवा खासदारांना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अशा घटनांवर तोंड उघडावेसे वाटत नाही. यापेक्षा वाईट ते काय? आलापल्लीत आदिवासी मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी हे जर मुस्लीम किंवा इतर समुदायाचे असते किंवा मुलगी उच्चभ्रू हिंदू असती तर याच हिंदुत्ववादी संघटनांनी पराचा कावळा करीत उर बडवत घटनेला देशव्यापी करण्यात तसूभरही कमी केली नसती. येथे पिडीत आदिवासी आणि नराधम हिंदूत्ववादी संघटनांचे सदस्य आहेत म्हणून मूग गिळून बसलाहात!
वडसा येथील घटनेवर स्थानिक आमदार कृष्णा गजभे, ज्यांना लोक संवेदनशील आमदार म्हणून ओळखतात त्यांची निषेधाची साधी प्रेस नोट रिलीज झाली नाही. चामोर्शी आणि गडचिरोली च्या घटनेवर गडचिरोलचे आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रतिक्रिया नाही. गडचिरोलीच्या विकासाचे हागल्या-मुतल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून प्रतिक्रिया देत असतात. तर घराशेजारी घडलेल्या घटनेवर अहेरीचे आमदार धर्मराव आत्राम यांना किंवा स्वतः आदिवासी असलेल्या जिपच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना आदिवासी मुलीवरील बलात्काराची दखल घ्यावीशी वाटत नाही. जिल्ह्यातील कांग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा आप, बीआरएस या सारख्या एकाही मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना किंवा आदिवासी नेत्यांना बलात्कारासारख्या दुष्कृत्यावर बोलावेसे वाटत नाही. यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते? खासदारांचे तर सांगूच नका, गडचिरोली चिमुर लोकसभेचे ब्रह्मांड, पायाला भिंगरी बांधल्यागत फिरताना वाघाच्या, बिबट्याच्या, प्रसंगी कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमींच्या घरी जाऊन दिलासा देत असताना, कार्यकर्त्याच्या घरच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून स्वतःलाही हळद माखून घेताना आदिवासी पीडीतेच्या घरी जाऊन दिलासा देण्यासाठी सोडा साधे प्रसिद्धी पत्रक काढून निंदा करण्यासाठी वेळ मिळत नाही.
त्यामुळे अशा निंदनीय घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त न करणारे नेते किंवा समाजधुरिण, महिलांसाठी काम करणाऱ्या संघटना, संस्था एकतर संवेदनाहीन, केवळ स्वार्थी, उदासीन, निष्प्रभ, नालायक असतील किंवा षंढ तरी असतील यापेक्षा दुसरे काहीही म्हणावेसे वाटत नाही.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!