अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१२ जून
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी बलात्कार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी(ता.१०) रात्री घडली. याप्रकरणी अहेरी पोलीसांनी आरोपी रोशन गोडसेलवार (२३ रा. आलापल्ली) आणि निहाल कुंभारे ( २३) दोघांवरही गुन्हा दाखल करुन अटक केली. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना सोमवारी अहेरी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एक आरोपी बजरंग दलाचा कार्यकर्ता तर दुसरा युवासेनेचा कार्यकर्ता असल्याचे समजते.
एटापल्ली येथील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर टी. सी. घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. टी सी मिळायला वेळ लागेल असे शाळेतील कर्मचाऱ्याने सांगितल्यावर ती एटापल्ली येथे जाण्यासाठी आलापल्लीच्या बस स्थानकावर आली. काही वेळातच तिला तिचा मित्र निहाल कुंभारे हा बाईकने जाताना दिसला असता तिने निहालला फोन करून बोलावून सांगितले की तिला चक्कर येत असल्याने काही वेळासाठी शांतपणे आराम करता येईल अशा ठिकाणी घेऊन चल. बरे वाटल्यानंतर मला एटापल्ली येथे सोडून दे. त्यानुसार निहाल ती जिथे ऊभी होती तिथे आला आणि त्याने सदर मुलीला दुपारी रोशन गोडसेलवार च्या खोलीवर नेले. तिला आराम करायला सांगितले आणि पिण्यासाठी पाणी दिले. परंतू त्या पाण्याची चव वेगळीच होती. त्यामुळे तिला झोप लागली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा गोडसेलवार तिच्यावर बलात्कार करीत होता.तिने विरोध केला पण त्याला न जुमानता रोशन नंतर निहालनेही तिच्यावर बलात्कार केला. आणि पहाटे तिला आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. तिला चक्कर येत होती म्हणून काही लोकांनी तिला पाणी पाजले. त्यावेळी तिने तिथेच आपबिती सांगितली. दरम्यान स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने तिला समजावून तुझी बदनामी होईल. त्यामुळे तक्रार न करता तू घरी जा, असा सल्ला दिला. दरम्यान चौकात तिला एक ओळखीचा युवक भेटला. त्याला तिने एटापल्ली येथे सोडून दिले.घरी गेल्यावर तिने दुसऱ्या दिवशी आपल्यावरील अतिप्रसंगाची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनी सदर प्रकार पिडीतेच्या घरी सांगितला. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून घटनास्थळ हे अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने गुन्हा अहेरी पोलीसांकडे वर्ग केला. अहेरी पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. त्यानंतर रात्री उशिरा दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. यापैकी एक आरोपी बजरंग दलाचा सदस्य तर दुसरा युवासेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेता जयश्री वेडधा जराते यांनी तीव्र निषेध केला असून आरोपींवर एट्रासिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
मजूर महिलेवर नातेवाईकानेच केला अतिप्रसंग
गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोल मजूरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या गडचिरोली शहरातील एका विवाहित महिलेवर तिच्याच नातेवाईकाने पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून, कपडे धुण्याच्या निमित्ताने घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला असल्याची फिर्याद पिडीत महिलेने आपल्या पतीसह पोलीस स्टेशनला जाऊन नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.