झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय देणार- सहपालकमंत्री आशिष जयस्वाल
सुप्रसिध्द अभिनेते भारत गणेशपुरेंची लक्षवेधी उपस्थिती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ ऑक्टोबर
झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यकलेसह सर्व प्रकारच्या कलेचे संवर्धन आणि प्रसारासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून या कलेला राजाश्रय देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले. ते शनिवारी देसाईगंज येथे आयोजित पाचव्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाट्यकलावंत प्राचार्य के.आत्माराम, स्वागताध्यक्ष आमदार रामदास मसराम, विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हास्य अभिनेते भारत गणेशपुरे, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, प्रा.डॉ.शेखर डोंगरे, नरेंद्र गाडेकर, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल म्हणाले की, झाडीपट्टी नाट्यकलेच्या मागे राज्य सरकार ताकदीने उभे आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या या डिजिटल जगातही गडचिरोलीच्या झाडीपट्टीचे वैभव टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासन यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीकडून १० लाख रुपये निधी मंजूर केल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, झाडीपट्टी कलावंतांना मानधन, विमा योजना आणि सुसज्ज नाट्यगृह या सर्व बाबींसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. देसाईगंज येथे वातानुकूलित नाट्यगृह उभारण्यासाठी मुंबईत बैठक घेऊन आवश्यक निधी मिळविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने नुकतेच झाडीपट्टी महोत्सवासाठी २३ लाख रुपये मंजूर केले आहेत. तो कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाईल आणि या परंपरेला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळेल.
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है.. असे सांगत त्यांनी जाहीर केले की, विदर्भात रामटेक येथे मुंबई आणि कोल्हापूरनंतर तिसरी चित्रपट नगरी उभी राहणार आहे. त्यामुळे झाडीपट्टीतील कलाकारांसाठी रोजगार आणि संधींचे नवे दालन खुले होईल. ॲड. जयस्वाल यांनी कलावंतांना आवाहन केले की, नाट्यकलेच्या जिवंत परंपरेला पुढे नेण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी ठोस प्रस्ताव तयार करा. शासन सर्वतोपरी मदत करेल आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवील. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत आणि गडचिरोलीचे पालकमंत्री पण आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या आणि अपेक्षा पूर्ण केल्या जातील. शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
“खरा कलावंत तोच जो आयुष्यालाही रंगमंच मानतो”
संमेलनाध्यक्ष प्राचार्य के.आत्माराम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “रंगमंचावर सगळे समान असतात. नायक असो वा पार्श्वभूमीतील कलाकार, प्रत्येक भूमिकेला महत्त्व असते. प्रेक्षकांच्या मनात जेव्हा सामूहिक परिणाम घडतो तेव्हाच नाटक यशस्वी ठरते. सहकार हा नाट्यकलेचा श्वास आहे. रंगभूमीशी प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि समर्पण हीच खरी कलाकाराची ओळख आहे. अभिनयापुरतीच नव्हे तर जगण्यातही कलावंताची वृत्ती जोपासा. खरा कलावंत तोच जो आयुष्यालाही एक सुंदर नाटक मानतो.”
सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “झाडीपट्टी ही सक्षम रंगभूमी आहे. या कलेची परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
आमदार रामदास मसराम यांनी झाडीपट्टी कलावंतांना मानधन देण्याची आणि नाट्यगृह उभारणीची मागणी केली. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी वडसा येथे नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती शासनाकडे केली.
संमेलनाचे प्रास्ताविक डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी केले. त्यांनी झाडीपट्टी नाट्यकलेच्या विकासासाठी शासनाकडे आरोग्य विमा, मानधन व नाट्यगृह यांसारख्या मागण्या मांडल्या.
संमेलनाचे आयोजन जिल्हा प्रशासन व झाडीपट्टी नाट्यसंमेलन समितीने केले असून यात नाट्यप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाला नाट्य कलावंत व प्रेक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.