आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ ; बंदोबस्त करावा या मागणीसाठी नागरिकांचे भव्य चक्का जाम आंदोलन
कांग्रेस चे आमदार रामदास मसराम व कम्युनिस्ट नेते अमोल मारकवार यांचा पुढाकार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.६ डिसेंबर
आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात गेल्या २० दिवसांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सलग वाढणाऱ्या हल्ल्यांनंतरही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
या गंभीर परिस्थितीत आमदार रामदास मसराम व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या मागणीसाठी देऊळगाव येथे भव्य चक्का जाम आंदोलन छेडले. या आंदोलनात आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांच्यासह काँग्रेस चे नेते मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार, सागर वाढई, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक, आजाद समाज पार्टीचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, सोनाशी लभाने यांसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजारो नागरिकांच्या सहभागामुळे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संतप्त जनतेने तब्बल दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोषणाबाजी, प्रशासनावरील रोष आणि ठोस कारवाईची मागणी असे वातावरण आंदोलनादरम्यान पाहायला मिळाले.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वनविभाग, तहसील कार्यालय आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून अखेर त्यांना मान्यता देण्यात आली. विशेषत: धोकादायक ठरलेल्या वाघाला पकडून १० तारखेपर्यंत पिंजऱ्यात बंद करण्याचे आश्वासन वन विभागाने दिले.
अखेर मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन संयमाने विसर्जित करण्यात आले. मात्र या घटनेमुळे प्रशासनावरील जनतेचा रोष प्रकर्षाने समोर आला असून पुढील काही दिवसांत वन विभागाच्या कारवाईवर संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहणार आहे.


