बनावट देशी दारु बनविण्याच्या साहित्यासह १०.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ नोहें.
धानोरा तालुक्यातील मुरूमगावमध्ये असलेल्या बनावट देशी दारू तयार करण्याच्या कारखान्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करून तेथील साहित्य जप्त केले. या कारवाईत बनावट देशी दारू, दारू बनविण्याचे साहित्य आणि दोन वाहने मिळून १०.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र हा कारखाना चालविणारा कुख्यात दारू तस्कर व्यंकटेश बैरवार मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला व्यंकटेश बैरवार, रा.मुरुमगाव हा आपल्या घरी बनावट देशी दारु तयार करण्याचा कारखाना चालवून ती बनावट दारू इतरत्र पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने मुरूमगाव बाजार मंडीत सापळा रचला. त्या ठिकाणी मालवाहू चारचाकी वाहन (एमएच ३४, एव्ही २०५१) उभे होते. त्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मागील डाल्यात चोरकप्पा तयार करून त्यात देशी-विदेशी दारूचा साठा मिळून आला. त्यानंतर जवळच असलेल्या व्यंकटेश बैरवार याच्या मालकीच्या अशोक लेलँड (दोस्त) या मालवाहू वाहनाची (एमएच ३३, टी २०३५ ) पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात बनावट दारू बनविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्याचे (स्पिरीट) दोन ड्रम सापडले. त्याच भागात असलेल्या आरोपी व्यंकटेश बैरवार याच्या घरी जाऊन पोलीस पथकाने शोध घेतला असता घरात बनावट दारू बनविण्याकरिता वापरण्यात येणारे, तसेच सिलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले.
या कारवाईत २ सिलिंग मशिन, प्लास्टिक पाईप, खाकी खरडे, बनावट दारूला सिलबंद करण्यासाठी वापरले जाणारे २२९ नग झाकण, रॅाकेट देशी दारू प्रवरा डिस्टीलरी असे मुद्रित केलेले खाकी रंगाचे खरडे, तसेच बनावट दारूसाठी वापरले जाणारे ५०० किलो स्पिरीट, ४०० नग रॅाकेट देशी दारू संत्रा बॅाटल आणि दोन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि.भगतसिंग दुलत, नायक धनंजय चौधरी, अंमलदार राजू पंचफुलीवार, वृषाली चव्हाण यांनी पार पाडली. पुढील तपास पोउपनि.सचिन ठेंग (मुरुमगाव) हे करीत आहेत.


