गडचिरोलीचे आमदार डॉ नरोटे बनले वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाच्या झारीतील शुक्राचार्य?
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या शिफारशीनुसार कृषी महाविद्यालयाची, वैद्यकीय महाविद्यालयाला आवंटित झालेली अतिरिक्त जागा परत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश ; श्रेयवादाच्या अनैतिक लढाईसह राजकीय कुरघोडीचा प्रयत्न

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १० सप्टेंबर
गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला असताना गडचिरोलीच्या आमदाराने केवळ श्रेयवादाच्या लढाईतून विनाकारण जागेचा विषय उकरून काढला आणि आणि सत्तेचा दुरुपयोग करीत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांना हाताशी धरून सुरू असलेल्या विकासकामात झारीतील शुक्राचार्य बनुन विकासाचे सिंचन रोखण्याचा प्रयत्न करीत असलेल्या गडचिरोलीच्या आमदाराच्या विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गडचिरोलीत १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वत्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याकरीता वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग, शासन निर्णयान्वये २०२३ साली मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
नवनिर्मात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली या संस्थेच्या नावे ७/१२ नुसार ३२.६५ हे. आर. (८०.६८ एकर), क शिट नुसार २८.९० हे.आर.(७१.४१ एकर जागा आहे. त्यापैकी ११.१७ हे.आर.२७.६१ एकर) जागेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व टि.बी. रुग्णालय कार्यान्वीत असून १७.७२ हे.आर. (४३.८० एकर) वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकाम करण्याकरीता उपलब्ध आहे. या संस्थेच्या नावे असलेल्या सर्व जागांची ताबा पावती महाविद्यालयाच्या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. त्यानुसार १७.७२ हे. ( ४३.८०एकर) जागेवर बांधकाम करण्याकरीता ब्रिज ॲन्ड रुफ कंपणीच्या आर्किटेक्ट कडून वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय,वसतीगृह व निवासी इमारतीचे नकाशे तयार करण्यात आले असून महाविद्यालयीन परिषदेत त्यास मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे. इमारतीचे बांधकाम करण्याकरीता आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत संबधीत
विभागांना पत्र व्यवहार करण्यात आले असून काही विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन विकासाचा हा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळवले होते.
आता महाविद्यालयास हस्तांतरित करण्यात आलेल्या क प्रतीनुसार २८.९० हे. म्हणजे ७१.४१ एकर जागेपैकी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकोला अधिनस्त कृषि विज्ञान केंद्र व कृषि संशोधन केंद्र गडचिरोली यांची, सर्वे क्र.१२९ ची १०.५३ हे. व १३४/४ ची ४.४७ हे. अशी एकुण १५ हे. म्हणजे ३७.६ एकर जागा कृषि विज्ञान केंद्राला परत करण्याबाबत राज्यमंत्री (कृषी)व सहपालकमंत्री, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कृषी महाविद्यालयास परत देण्याचे निर्देश राज्यमंत्री (कृषी) यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी ९ जुलै च्या बैठकीमध्ये १५ हेक्टर जागा कृषि विज्ञान केंद्राला परत देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. असे या अहवालात म्हटले आहे.
याच अहवालात पूढे असेही म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरुन जर जागा परत घेण्याची कार्यवाही सुरू झाली तर ४७१ कोटी रुपयांचे मंजूर निधीचे विकासकार्य ठप्प पडेल. ते पुढे कधी पूर्णत्वास जाईल हे सांगणे कठिण आहे. परिणामी संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाची गती अवरोधित होईल.
सध्या महाविद्यालयात एम बी बी एस च्या प्रथम वर्षात १०० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून द्वितीय सत्रातील १०० विद्यार्थी प्रवेशित होण्यासाठी निरीक्षण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. अशा वेळी सरकारकडून आडकाठी आणली जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विना आडकाठी होणाऱ्या कामात काहीही कारण नसताना जागा परत करण्याचे पिल्लू बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास अडथळा आणला आहे अशी खंतही माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी व्यक्त केली आहे.
कृषी विज्ञान केंद्राची जागा परत द्यावी अशी मागणी गडचिरोलीत कुणीही केलेली नाही. जागा हस्तांतरित करताना सुद्धा कुणाचेही आक्षेप नव्हते. अशावेळी जागा परत करण्याचा विषय कुठून पुढे आला? तो कोणी व कां आणला याचे स्पष्टीकरण गडचिरोलीच्या जनतेला दिले पाहिजे. असेबोलल
एकुणच काय तर गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे संपूर्णपणे मार्गी लागलेले प्रकरण फक्त श्रेयवादासाठी बाधित करून विकासाच्या झारीतील शुक्राचार्य बनने नव्हे तर काय आहे? असा प्रश्न यानिमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाला आहे.
यासंदर्भात गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचेशी भ्रमणध्वनीवर प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न केले असता पहिल्या कॉलवर ते बैठकीत असल्याचे सांगून नंतर कॉल करा मी सांगतो. असे उत्तर दिले मात्र साधारणतः ५.५४ वाजताच्या दरम्यान कॉल केला असता त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती आम्ही प्रकाशित करु.