मुख्यमंत्री जिल्हावासीयांना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट देणार काय? कांग्रेस चा सवाल
जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयासमोर होणार लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप कार्यक्रम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २१ जुलै
गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारुन साडेतीन वर्षे झालीत. परंतू मुख्यमंत्री तथा पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेकडून आश्वासनांचे लॉलीपॉप देण्यापलीकडे जिल्हा विकासाचे दखल घेण्यायोग्य एकही काम झाले नाही. आता वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना फडणवीस जिल्हावासीयांना विकासरुपी रिटर्न गिफ्ट देणार काय? म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मंगळवारी, लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सोमवारी स्थानिक विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार रामदास मसराम, मनोहर पोरेटी, प्रभाकर वासेकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा एड. कविता मोहोरकर, वामन सावसागडे, महासचिव घनश्याम वाढई, वसंता राऊत, रजनीकांत मोटघरे यांचेसह कांग्रेस चे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलतांना ब्राह्मणवाडे यांनी जिल्ह्यातील यापूर्वीचे पालकमंत्री दिवंगत आर.आर. आबा पाटील यांनी केलेल्या विकासकामांशी तुलना करीत पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस किती थुटे पडले आहेत, याचा पाढाच पत्रकारांसमोर वाचला. १६२ कोटी रुपयांच्या खनिज निधीतून जिल्ह्यातील विकासकामे सुरू केली नाहीत. निधी अभावी विकास कामे ठप्प पडले आहेत. जनतेच्या समस्या मार्गी लागत नाहीत. रस्ते व पुलांची वर्षानुवर्ष कामे रखडलेली आहेत. धान विकलेल्या इतर शेतकऱ्यांना पूर्ण बोनस अद्याप मिळालेला नाही. वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी तर दिलीच जात नाही. उलटपक्षी भरलेले पैसे जीएसटी कापून जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जात आहेत. निवडणुकीपूर्वी युती शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली नाही. शालेय विद्यार्थ्यांना आवागमनासाठी बसेस तर आहेत परंतू त्या चालविण्यासाठी चालक – वाहकांची कमी आहे. जिल्ह्यातील अनेक विभागांत ५० टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत. अशा अनेक समस्यांनी जिल्हा ग्रसीत झाला आहे. अशावेळी मुख्यमंत्री गडचिरोलीत येऊन कुणाचा विकास करतात? त्यांनी पालकमंत्री पद स्वमर्जीने स्वीकारले, ते जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी की फक्त उद्योगपती मित्रांसाठी? असाही सवाल उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांची जिल्हा विकासाप्रती नकारात्मक भूमिकेला वाढदिवसाच्या दिवशी कदाचित सकारात्मकतेमध्ये बदलता यावे म्हणून जिल्हा काँग्रेसचे वतीने कांग्रेस कार्यालयासमोर प्रतिकात्मक लॉलीपॉप व चॉकलेटचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.