महावितरण कार्यालयावर आजाद समाज पार्टीचे घेराव आंदोलन
मागेल त्याला सौर पंप योजनेचा फज्जा ६० दिवसाची मर्यादा असताना, पाच महिने होऊन सौर पंप नाही

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२१ जुलै
‘मुख्यमंत्री मागेल त्याला सौर पंप’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी डिमांड भरून तब्बल १५० दिवस झाले तरी सौर पंप मिळालेले नाहीत, शेतकऱ्यांच्या या समस्येवर आजाद समाज पक्षाने गडचिरोली येथील महावितरण कार्यकारी अभियंता पारेख यांना कार्यालयात घेराव घालत तीव्र आंदोलन केले.
वर्क ऑर्डर नुसार शेतकऱ्यांनी डिमांड भरल्या नंतर ६० दिवसात सौर पंप बसवणे बंधनकारक असतानाही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. शासनाने मोठमोठ्या जाहिरातीतुन सदर योजनेचा प्रचार केला व प्रचंड खर्च केला. पण शेतकऱ्यांना अद्याप याचा लाभ मिळाला नाही. महावितरण अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून कंपनीवर कारवाई करावी व संबंधित कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी आजाद समाज पक्षाकडून करण्यात आली. विज चोरीच्या आरोपाखाली ५० हजार रुपयांहून अधिक दंड सामान्य नागरिकांवर लादण्यात आला असून त्यामध्ये गैरप्रकार झाल्याची शक्यता असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आजाद समाज पक्षाचे जिल्हाप्रभारी विनोद मडावी व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड म्हणाले, “सरकार योजना जाहीर करते, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीत मोठ्या त्रुटी आहेत. त्वरित कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल. ग्राहकांच्या परवानगीशिवाय नवीन वीज मीटर बसवू नये अशीही मागणी त्यांनी केली आहे.
महावितरणचे अधिकारी पारेख यांनी निवेदन स्वीकारले व वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी विनोद मडावी, राज बन्सोड यांचेसह महासचिव पुरुषोत्तम रामटेके, प्रकाश बन्सोड, नागसेन खोब्रागडे, धनराज दामले, महिला आघाडी अध्यक्ष सोनाशी लभाने, सविता बांबोळे, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे इत्यादी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते