मुख्यमंत्री गडचिरोलीत साजरा करणार आपला वाढदिवस
लायड्स मेटल्सच्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी, १० कोटी वृक्षलागवडीचा शुभारंभ

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २० जुलै
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:चा वाढदिवस गडचिरोली वासीयांसोबत साजरा करणार असुन, या निमित्ताने ते पालकमंत्री म्हणून एकात्मिक स्टील प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवत औद्योगिक विकासाचा मार्ग प्रशस्त करतानाच, पर्यावरण पूरक हरित गडचिरोलीची ओळख कायम ठेवण्यासाठी एक कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.
कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी येत्या २२ जुलै रोजी मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ठरणार आहे. उल्लेखनीय म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवसी (१ जानेवारी) मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हेडरी येथे उभारण्यात आलेल्या ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांटचे उद्घाटनही होणार आहे. हा प्रकल्प ‘एलएमईएल’ ने केवळ एका वर्षात पूर्ण केला आहे. यासोबतच १० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्लरी पाईपलाइन प्रकल्पाचे उद्घाटनही होणार आहे. ही स्लरी पाईपलाइन महाराष्ट्रातील पहिली लोखंड स्लरी पाईपलाइन ठरणार आहे. हेडरी ते कोनसरी अशी ८५ किमी लांबीची पॅलेट प्लांटदरम्यान असलेली ही पाईपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची असून, ती कार्बन उत्सर्जनात ५५ टक्के घट करेल आणि संपूर्ण प्रकल्पाच्या दळवणळणाची कार्यक्षमता वाढवेल.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी कोनसरी येथील कार्यक्रम स्थळाला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. या दौऱ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, बाबुराव कोहळे, डॉ. भारत खटी, अरुण हरडे, प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश, तसेच बलराम सोमनानी उपस्थित होते.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, २२ जुलै हा दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य शासनाने एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या २२ जुलै रोजी गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात ‘वृक्ष लागवड पंधरवडा’ सुरू करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात यावर्षी ४० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेले एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे राज्यातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असून, त्याची यशस्वी अंमलबजावणी वृक्ष लागवड पंधरवड्याच्या माध्यमातून करायची आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, वनसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचे फलक किंवा जाहिरातबाजी करु नये असे आवाहन केले आहे. यावरील खर्च हितचिंतकांनी गरजूंना मदत करण्यासाठी करावा असेही म्हटले आहे. गडचिरोलीत वाढदिवस साजरा करणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री असून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते गडचिरोली वासीयांना आणखी काय काय भेटी देतात. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.