गडचिरोलीच्या इतिहासाचे पहीले पान युआयटीच्या उद्घाटनाने लिहीले जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोंडवाना विद्यापीठ व मेसर्स लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांचे सार्वजनिक खाजगी-भागीदारी तत्वावर आयोजित 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' चे उद्घाटन संपन्न
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २७ डिसेंबर
मागिल १० वर्षात गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला.रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या, दुषणं पुसून भुषणं लावण्याचा प्रयत्न केला. जिल्हा माओवादा पासुन मुक्त केला. आता विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून मानव संसाधन निर्माण करण्याचा यत्न केला जाणार आहे. या उद्घाटनाने भविष्यात लिहील्या जाणाऱ्या इतिहासाचे पहीले पान लिहीले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ व मेसर्स लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांचे सार्वजनिक खाजगी-भागीदारी तत्वावर आयोजित ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ गडचिरोली चे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, मंत्री डॉ. पंकज भोयर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चे लेफ्टनंट कर्नल विक्रम मेहता, कार्यकारी संचालक व्यंकटेश सौंदर्यराजन, निवासी संचालक लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड हिंम्मत सिंग बेदला, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला साथ देऊ शकतो अशी क्षमता गडचिरोली जिल्ह्यात आहे. गडचिरोलीच्या परिवर्तनामध्ये बी प्रभाकरन यांची मदत झाली. यापूढे गडचिरोलीत तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. स्थानिक मानव संसाधन असण्याची गरज विद्यापीठाने तयार केले पाहिजे. फ्यूचर रेडी इंडस्ट्रीज आणि एकाडेमिया कोलॅबोरेशन याचे युआयटी हे उत्तम उदाहरण ठरणार आहे.
उल्लेखनीय आहे की विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांना विदेशातील विद्यापीठात शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे. ही तंत्रज्ञान संस्था गडचिरोली या जिल्ह्यातील होतकरू व गुणवंत युवकांच्या तंत्र कौशल्य शिक्षणासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे. गडचिरोलीमध्ये तांत्रिक शिक्षणाला चालना देणारी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड गडचिरोली येथील युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापनेमागील प्रमुख प्रेरक शक्ती म्हणून पुढे आली आहे. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागात तांत्रिक शिक्षण बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही संस्था गोंडवाना विद्यापीठाच्या सहकार्याने भागीदारी मॉडेलअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च २०० कोटी असून त्यापैकी लॉयड्स चे २५ कोटींचे योगदान दिले आहे. लॉयड्स मेटल्स आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार मे २०२५ मध्ये करण्यात आला. एआयसीटीई महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर युआयटीने ऑगस्ट २५ पासून शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. सध्या येथे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या डिप्लोमा अभ्यासक्रमांचे संचालन केले जात आहे. गडचिरोलीतील दुर्गम, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
संस्था अधिक सक्षम करण्यासाठी लॉयड्सने अनेक वेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. गडचिरोलीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संबंधित सर्व खर्चाचा संपूर्ण भार कंपनी उचलत आहे. याशिवाय, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ऑन-द-जॉब प्रशिक्षण देण्याची हमी देण्यात आली असून ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठाशी असलेल्या करारामुळे निवडक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
युआयटीच्या माध्यमातून लॉयड्स मेटल्सचा उद्देश उद्योगासाठी सज्ज तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे आणि परिसराच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देणे हा असून, समावेशक विकास व स्थानिक क्षमता निर्माणाबाबतची आपली बांधिलकी अधिक दृढ करणे हा आहे.
कार्यक्रमात युथ पॅरा गेम्स दुबई ची विजेती श्वेता कोवे हिचा एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
प्रस्तावना डॉ.बोकारे यांनी केली. ते म्हणाले की युआयटी ही संस्था मैलाचा दगड ठरणार आहे. विद्यापीठाचे कंडक्टेड इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले. जुलैमध्ये बीटेक सुरू होतेय. मायनिंग, कम्प्युटर सायन्स, गडचिरोली मागास जिल्हा हा डाग गोंडवाना विद्यापीठ पुसून काढल्याशिवाय राहणार नाही.
कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, विद्यापीठाचे युआयटी प्रभारी संचालक प्रा. मनिष उत्तरवार, सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी, रविंद्र ओल्लालवार, बलराम सोमनानी, वेदांश जोशी, शीतल सोमनानी, हे प्रामुख्याने उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. अनिल हिरेखण यांनी केले.

