जलशक्ती अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रसरकारचे पथक गडचिरोलीत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १५ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात विविध यंत्रणांनी जलशक्ती अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे केले असून शुक्रवारी केंद्र सरकारच्या पथकाने गडचिरोली येथील या कामांची पाहणी केली. लशक्ती अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांना वैज्ञानिक दृष्टीकोन व स्थानिक नागरीकांच्या अनुभवांची सांगड घातल्यास जलसंवर्धनाचे काम अधिक जोमाने होईल असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाचे केंद्रीय अधिकारी कुणाल कुमार यांनी केले. गडचिरोली येथे नियोजन भवन येथे आयोजीत आढावा सभेत ते बोलत होते. भूगर्भातील भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या जलशक्ती अभियान अंतर्गत कामाबाबत विस्तृत माहिती दिली व भुवैज्ञानिक तसेच जीआयएस तज्ञ यांचेकडुन जिल्ह्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या. जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात आलेल्या ३० ते ३२ गावात पाणी पातळी खोलवर आहे. अशा गावात जलसंवर्धन व पुनर्भरणाची कामे करण्यात यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुचविले.
आढावा सभेनंतर केंद्रीय पथकाने गडचिरोली येथील जलशक्ती केंद्रास भेट दिली. तसेच जिल्ह्यातील पोर्ला येथील परिसरात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जलशक्ती अभियानाचे वैज्ञानिक तथा तांत्रिक अधिकारी फणी कुमार, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. एम.इंगोले, चौधरी, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) तुरकर आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) माणिक चव्हाण उपस्थित होते.