
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १९ जुलै
गडचिरोली येथे टाईल्स मार्बल व इतर साहित्य घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जवळ सोमवारी मध्यरात्री घडली.
धनराज झिलपे (४५) रा. शिवराजपुर ता. देसाईगंज, अतुल झोडे (२५) रा. उसेगाव ता. देसाईगंज अशी मृतकांची नावे आहे तर विलास चहादे (२६) रा. देसाईगंज , रुपेश आत्राम (५०) रा. फरी ता. देसाईगंज , कालेश्वर मेश्राम (२६) रा. शिवराजपुर ता. देसाईगंज व वाहन चालक विक्रम मोहुर्ले (२३) रा. कोकडी ता. देसाईगंज अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री वडसा देसाईगंज येथून टाईल्स मार्बल व इतर साहित्य घेऊन एमएच ३३ के ४११६ क्रमांकाचा पिकअप वाहन वडधा-अमिर्झा मार्गे गडचिरोली येथे येत होते. दरम्यान अमिर्झा जवळ पुढील येणाऱ्या दुचाकी वाहनाला रस्ता देत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू पिकअप वाहन नाल्यात कोसळले. यात वाहनात असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले व जखमींना अमिर्झा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरु आहे. पोलिसांनी वाहन चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार प्रभाकर भेंडारे करीत आहेत.
दुचाकीची उभ्या ट्रक ला धडक ; नागपुरात गडचिरोलीतील युवकाचा अपघातात मृत्यू
मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात गडचिरोली येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नागपूर येथील हिंगणा टी पॉईंट जवळील मेट्रो स्टेशन लगत घडली. मीर भास्कर मेश्राम (२०) असे या युवकाचे नाव आहे. सदर युवक नागपूर येथील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता.