आपला जिल्हा

उपमुख्यमंत्र्यांनी केली चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

तातडीने सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना मदत करणार- उपमुख्यमंत्री, फडणवीस

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १ जुलै

चंद्रपुर जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे परिस्थिती निर्माण होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तसेच अनेक घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.  यावेळी त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आले असून शेत जमीन पाण्याखाली गेली आहे पुराच्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली. अशा नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने त्वरित मदत देण्यात येणार असून मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अंतिम आकडेवारी आल्यावर जास्तीत जास्त मदत केली जाईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील नवेगाव पेठ, पिंपळनेर, चावडी मोहल्ला येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तालुक्यामध्ये १ जून ते १९ जुलैपर्यंत सरासरी ७०१ मिमी पावसाची नोंद झाली. पुरामुळे नेरी, सिरपूर, कळमगाव, पांजरेपार, बाम्हणी, सावरगाव व मालेवाडा, वाढोणा तर महालगाव काळू या गावातील ६० कुटुंबातील २०८ नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. आतापर्यंत तालुक्यातील ५४७ घरे व ३८ गोठ्यांची अंशतः पडझड झाली असून १७ घरे व 3 गोठे पूर्णतः पडली आहे. कृषी विभागाकडून केलेल्या प्राथमिक तपासणीच्या अनुषंगाने ३३ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात पुरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचे शोध व बचाव कार्य चंद्रपूर आपत्ती निवारण पथकाद्वारे सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, चिमूरचे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, गटविकास अधिकारी खोचरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव टिके यांच्यासह प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी का आमदाराच्या वाढदिवसासाठी ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील पुरग्रस्त चिमूर भागातील पाहणी केली. उल्लेखनीय आहे की भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचा मंगळवारी वाढदिवस होता. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा कार्यक्रमात हजेरी लावली त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा शासकीय दौरा हा पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी की भाजप आमदारांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यासाठी होता, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी दुपारी चंद्रपूर येथे दाखल झाले व चिमूर तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली. चिमूर तालुक्यात पुराने थैमान घातले असून सोमवारी सायंकाळपासून पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू  असलेले भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या वाढदिवसासाठीच चंद्रपूर दौरा केला असे मानले जात आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!