सिरोंचा तालुक्यातील १० हजार १५० स्थलांतरीत नागरिक स्वगृही परतले
पुन्हा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १९ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून झालेल्या संततधार पावसाने दक्षिण गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली. सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. मंगळवारी पावसाने विश्राती घेतल्याने पूरपरिस्थिती कमी होत असून सिरोंचा तालुक्यातील १० हजार १५० नागरिक आपल्या गावी परतले आहेत. वैनगंगा, प्राणहिता नद्यांमधील पाण्याचा विसर्ग वाढत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
भामरागड, अहेरी तालुक्यातील काही भागात अजूनही पूरस्थिती कायम असून जिल्ह्यात १८ लहान मोठे रस्ते पाण्याखाली आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे गोदावरी नदीकाठी असलेल्या गावांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. सिरोंचा तालुक्यातील १० हजार १५० नागरिक आपल्या गावी परतले असून अजूनही दोन गावातील १९२ नागरिक निवारागृहात आहेत. तर जिल्हयातील वेगवेगळया तालुक्यात अजून ८५ कुटुंबातील २८७ जण निवारागृहात आहेत. वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनी, वडसा व वाघोली या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे. नदीची पाणी पातळी आष्टी केंद्रावरील नोंदीनुसार धोका पातळीच्या वर आहे. जिल्ह्यात सुरू असलेली संततधार व नदीमधील विसर्ग यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये नाले भरून वाहत आहेत.
१ जून पासून जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस
१ जून ते १९ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. १९ जुलै पर्यंत ४७३.२ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना यावर्षी दुप्पट म्हणजेच ८५५ मिमी पाऊस झाला. मागील वर्षी या कालावधी पर्यंत ८६.२ टक्केच पाऊस झाला होता. यावर्षी सर्वाधिक १२८० मिमी पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला. तसेच अहेरीत ११३४ मिमी, भामरागड १०५५ मिमी नोंद झाली. यावर्षी १ जून ते १९ जुलै पर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी च्या ६८ टक्के पाऊस पडला आहे.