लॉयड मेटल्सच्या विस्तारीत प्रकल्पाच्या जनसुनावणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोनसरी येथे पर्यावरणविषयक जनसुनावणी संपन्न

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२३ जानेवारी
जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने उभारलेल्या लोहप्रकल्पाच्या विस्तारासाठी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कोनसरी येथे पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी औद्योगिक विकासाद्वारे बेरोजगारी दूर करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी लॉयड्सच्या लोहप्रकल्प विस्ताराचे स्वागत करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी जनसुनावणी घेणारे प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले, जिल्हाधिकारी अविशांत पांडा, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोनसरी येथील स्टील प्लाँटचे विस्तारीकरण करून तो २ बाय ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट), १० दशलक्ष टन प्रतिवर्ष (थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट) आणि २ बाय ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष (आयरन ओर पेलेट प्लाँट), तसेच इंटिग्रेटेड स्टील प्लाँट (४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता) एवढा वाढविण्याकरिता ही जनसुनावणी घेण्यात आली. कोनसरी आणि परिसरातील गावांतील नागरिकांनी या सुनावणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी केली. पर्यावरण, रोजगार व प्रकल्पाच्या परिणामांबाबत अनेकांनी आपले सकारात्मक मत मांडले. उद्योगाचा विस्तार होताना प्रदूषण वाढू नये, याकरिता कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यासह सांडपाणी व्यवस्थापनाचेही कौतुक केले. मात्र, उद्योगातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये व त्याचा त्रास जनसामान्यांना होऊ नये,यासाठी विशेष काळजी घ्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुरजागड खाणीतून निघालेल्या लोहखनिजावर हा प्रकल्प आधारित असल्याने येथे स्थानिकांनाच रोजगार द्यावा, प्रकल्पबाधित होत असलेल्या गावांना योग्य मोबदला देऊन या गावांचा मॉडेल व्हिलेज अर्थात आदर्श आधुनिक, सर्व सुविधायुक्त गावांप्रमाणे विकास करावा, सर्व प्रकल्पबाधित गावांना सर्वच प्रकारच्या सुविधा द्याव्या, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करावी, सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा निर्माण करावी, जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक भरपाई देतानाच कंपनीचे शेअर द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यात आजवर माओवाद्यांच्या भितीने कुणीच उद्योग उभारण्याची हिंमत केली नाही. पण या कंपनीने साहसी पाऊल उचलत जिल्ह्यात उद्योगाच्या रूपात विकासाची पहाट आणली असल्याचे अनेकांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी माजी खासदार अशोक नेते, आ.धर्मराव आत्राम यांनी लॉयड्स कंपनीमुळे जिल्ह्यात समृद्धी आल्याचे सांगत येथील पोलाद निर्मितीमुळे जगात देशाची पोलादी देश अशी प्रतिमा निर्माण होईल, असे ते म्हणाले. पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांनीही उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील या एकमेव उद्योगाचा विस्तार झाल्यास जिल्ह्यात विकास,सुख आणि समृद्धी येईल, असे सांगितले. खासदार डॉ.नामदेव किरसान यांनीही जनसुनावणीला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी करत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासंदर्भात कंपनी करत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले.