दुसऱ्याच्या दु:खापेक्षा आपलं दुःख मोठं करुन सांगत पुढच्याचं दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आनंदाच्या वाटा विस्तीर्ण होतील
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे 'जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावरील व्याख्यानात प्रतिपादन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१३ जानेवारी
” माझ्या वाट्याला आलेलं दु:ख हे जगातील सर्वात मोठं दु:ख आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण ही वास्तविकता नाही. दुसऱ्याच्या प्रगतीत आपलं दुःख आहे. असा समज करुन घेतल्यावर आनंदाच्या वाटा कशा सापडतील? असा गंभीर प्रश्न उभा करीत दुसऱ्याच्या दु:खापेक्षा आपलं दुःख मोठं करुन सांगत पुढच्याचं दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आनंदाच्या वाटा विस्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत “. असे मौलिक विचार अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले.
गडचिरोली येथील कमल – गोविंद स्मृती प्रतिष्ठान आणि दंडकारण्य परिवाराचे वतीने गो. ना. मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी स्थानिक संस्कृती सांस्कृतीक सभागृहात आयोजित जगण्यातील आनंदाच्या वाटा, या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, पद्मश्री डॉ परशुराम खुणे, सुधीर भातकुलकर, डॉ. सतिश गोगुलवार, गो.ना. मुनघाटे यांचे तीनही चिरंजीव कवी अनिल, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ डॉ. प्रमोद आणि दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे समवेत परिवारातील सदस्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील चोखंदळ श्रोते उपस्थित होते.
श्री कळमकर म्हणाले की जवळचा आनंद शोधता येत नाही म्हणून जीवन किरकिरं होतं. भारताच्या तुलनेत पाकिस्तान मध्ये सुखाच्या सोयी अत्यल्प असताना भारताचा हॅपीनेस इंडेक्स पाकिस्तान पेक्षा कमी आहे. अमंगळ भेदात गुंतल्यामुळे दुःखाच्या वाटा प्रशस्त झाल्या आहेत. पूर्वी होणाऱ्या रामलीलेचे उदाहरण देत राजकिय पुढाऱ्यांवर आसुड उगारताना ते म्हणाले की समाजामध्ये काहीतरी रुप घेतल्याशिवाय लोक पाया पडत नाहीत.
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचं जग हे संपर्क साधनारहित होतं पण त्यात आनंद होता. त्याकाळी कृष्णधवल टीव्ही पाहण्याचा आनंद रंगीत होता. आता मात्र सर्व रंगीत आले असले तरी आनंद मात्र काळवंडला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या युगात खरं म्हणजे माणसांनी तंत्रज्ञानावर स्वार व्हायला हवं परंतू इथे तंत्रज्ञानच माणसांवर स्वार झालेलं दिसतं. जग आभासीत व्हायला लागले. १४० कोटींच्या देशात १२० कोटींपेक्षा अधिक मोबाईल आहेत. सगळे मोबाईलशी जवळीक साधून आहेत. पण घरातल्यांशी संबंध दुरावले आहेत. ही परिस्थिती बदलण्याचे कारण आम्हीच आहोत. मोबाईल मुळे वाचन संस्कृती लयाला गेली आहे. पुस्तकंच जर वाचली गेली नाही तर संस्कार ते कसे होणार? असा गंभीर प्रश्न निर्माण करतानाच,आता शिक्षक सुद्धा पुस्तकं वाचत नाहीत. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
नवे आणि जूने जग तसेच आहे. त्यात आपल्याला जे दिसेल त्यात आनंद शोधा. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड पुढील पिढीला सांगितली पाहिजे. आनंद देणाऱ्या विनोदाच्या तळाशी वेदना असतात. तरीही त्यातील आनंद वाटा, वेदना वाटू नका. तंत्रज्ञानावर जगणारी पिढी अस्वस्थ आहे. असे ते म्हणाले. जगण्याच्या आनंदातून जीवनाचे वास्तव मांडतांना कळमकर यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक यांसारख्या अनेक क्षेत्रातील कुरीतीवर श्रोत्यांना खिळवून ठेवत आणि हसवत आसूड ओढले.
प्रास्ताविकात कवी अनिल मुनघाटे यांनी सांगितले की शालेय शिक्षणाचा प्रसार करताना गो.ना. मुनघाटे यांचा लोकशिक्षण हा सिलॅबस चा भाग होता. दंडकारण्य शिक्षण संस्था त्यांच्या लोकशिक्षणाचा वारसा सातत्याने पुढे नेत आहे. संचालन व आभारप्रदर्शन प्र. नरेंद्र आरेकर यांनी केले.