कमल – गोविंद प्रतिष्ठान चे वतीने ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ वर व्याख्यान
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.११ जानेवारी
गडचिरोली येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य दंडकारण्य शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदराव मुनघाटे आणि त्यांच्या कार्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या सुविज्ञ पत्नी स्व. कमल मुनघाटे यांचे स्मृती प्रित्यर्थ कमल-गोविंद प्रतिष्ठान आणि दंडकारण्य परिवाराचे वतीने उद्या रविवारी, हसता – हसता निखळ आनंद देणारे खुशखुशीत विनोदी शैलीतले व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतीक सभागृहात सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे. सदर व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती कमल-गोविंद प्रतिष्ठान आणि दंडकारण्य परिवाराचे वतीने करण्यात आली आहे.
उल्लेखनीय आहे की, जीवन या हातांनीच सुगंधी करता येते या भावनेने तत्कालीन मागास गडचिरोली जिल्ह्यात दंडकारण्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची मांदियाळी उभारणारे स्व. गोविंदराव मुनघाटे आणि यात त्यांना मोलाची साथ देणाऱ्या कमल मुनघाटे यांच्या कामाचा स्मृती गंध कायम जोपासताना दंडकारण्य शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ राजाभाऊ मुनघाटे हे सतत नवोपक्रम राबवित असतात. यंदा डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यानातून जगण्यातील आनंदाच्या वाटा दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. गडचिरोलीतील नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.