शोषणाविरुद्ध माझा लढा सुरू राहील – खासदार नामदेव किरसान
सिंचन, आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ जून
गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे शोषण (एक्सप्लॉयटेशन) थांबवण्यासाठी माझा लढा निरंतर सुरू राहील. मग ते खाणींपासून असो की मानवी उद्योग किंवा खाणींना आमचा विरोध नाही. परंतु विकास हा मानवी जीवनावर विपरीत प्रभाव टाकणारा नको. उद्योजकांनी कायदे आणि नियमांच्या चौकटीत राहून आपले उद्योग करावे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. असे वक्तव्य गडचिरोली – चिमूरचे नवनिर्वाचित खासदार नामदेव किरसान यांनी केले. ते गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि शहर अध्यक्ष सतिश विधाते यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले की संविधान आणि आरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर ही निवडणूक लोकांनी डोक्यावर घेतली होती. त्यात इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी घेतलेली मेहनत आणि जनतेने दाखविलेला विश्वास यातून मिळालेले यश आहे. त्यांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले.
किरसान यांनी सांगितले की गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक नद्या आहेत मात्र येथील शेतकरी बारमाही सिंचनाच्या सोयी पासून वंचित आहेत. बारमाही सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिकता असेल. केंद्रात जर इंडिया आघाडीसह कांग्रेस सत्ता स्थापन करण्यात जर यशस्वी झाली तर कांग्रेसच्या जाहीरनाम्यातील पाचही आश्वासन पूर्ण करणार. यासोबतच शिक्षण, आरोग्य रोजगार यासह सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करणार.
सख्य कायम राहील
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किरसान यांच्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत. वडेट्टीवारांचे वैशिष्ट्य असे आहे की ते ज्यांच्यासाठी कठोर मेहनत घेऊन त्यांना विजय मिळवून देतात. निवडणुकीनंतर सहा ते आठ महिन्यांत त्यांचे निवडून आलेल्या सोबत फाटते. गडचिरोली – चिमूर चे पहिले खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे आणखी काही आमदार वडेट्टीवारांनी वेळोवेळी कठोर परिश्रम घेउन निवडून आणले होते. मात्र त्यानंतर सहा ते आठ महिन्यांत वडेट्टीवार यांचेशी बिनसले ते कधीही जुळून आले नाही. या पार्श्वभूमीवर किरसान यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या वडेट्टीवारांशी किती दिवस सख्य राहील? या प्रश्नाचे उत्तर देतान किरसान म्हणाले की माझे कडून कधीही सख्य तुटणार नाही. ते कायम ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीन.