राजकीयविशेष वृतान्त

लोकसभा निवडणूक निकाल केवळ ३६ तासांवर; उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढले. गडचिरोली – चिमूर लोकसभेत अशोक नेते आणि डॉ नामदेव किरसान  यांच्यात काट्याची टक्कर.

उर्वरित ८ उमेदवार निकालाचे गणित फिरवणार काय? जिंकणाऱ्या उमेदवाराची लीड ५ ते १० हजारात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २ जून 

गडचिरोली – चिमूर लोकसभेकरीता पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले असून दीर्घ प्रतीक्षेनंतर ४ जून रोजी गडचिरोली – चिमूरचा लोकसभेतील जनता कुणाला संसदेत पाठवते हे निश्चित होणार आहे. रविवारी अग्नीपताकाचे नऊ दिवस संपलेले असतील आणि आकाशात ढग भरून आलेले दिसतील हे ढग कुणावर आपली वर्षा करतील आणि कुणाच्या डोळ्यातून अश्रूंची वर्षा करायला लावतील हे दिसून येणार आहे.

देशातील इतर भागांप्रमाणे लोकसभा निवडणूकीदरम्यान गडचिरोली – चिमूर क्षेत्राततही बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. कांग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेहमीप्रमाणे लोकसभेची सुत्र आपल्या हाती ठेवली आणि डॉ नामदेव किरसान यांची उमेदवारी भाजपच्या आधी घोषित करुन आपल्या ताकदीची चुणूक दाखवली. तर भाजपने अन्य कोणताही प्रभावी पर्याय नसल्याने विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली. दरम्यान लोकसभेचे प्रबळ दावेदार मंत्री धर्मराव आत्राम यांनी शेपूट घालून युती धर्म पाळला. तर कांग्रेसचे आदिवासी नेते डॉ नामदेव उसेंडी यांनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत कांग्रेस सोडून भाजपची कास धरली. कांग्रेसचे दुसरे एक प्रदेश सचिव डॉ नितीन कोडवते हे ही निवडणूकीपूर्वीच भाजपवासी झाले. रा.स्व. संघाची भूमिका काहीशी संशयास्पद राहिली तर भाजपचे गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी यांनी फ्रंट वर नेतेंशी दिलजमाई केली मात्र ‘पर्दे के पिछे’ काय केले यावरही अशोक नेते यांच्या जयपराजयाचा निकाल पहायला मिळणार आहे.

गडचिरोली चिमूर क्षेत्रात देवेंद्र फडणवीस आणि विजय वडेट्टीवार वगळता अन्य कोणतेही प्रभावी नेते प्रचारात फिरकले नाहीत. प्रचारात मोदी की ग्यारंटी, हॅटट्रिक, राममंदिर, ३७० असे मुद्दे होते तर विरोधी पक्षांकडून संविधान बदलणे, महागाई, बेरोजगारी भ्रष्टाचार, यांसह कांग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे होते स्थानिक पातळीवर विकासात पास –  नापास, ओबीसी आरक्षण, धर्मांतरीत आदिवासींचे आरक्षण काढून घेण्याचा मुद्दा असे मुद्दे होते.

भाजप आणि काँग्रेस च्या संघटनात्मक स्थितीचा विचार केला तर भाजपची रचना आणि व्यवस्थापन हे काँग्रेसच्या तुलनेत अधिक मजबूत दिसून आले. परंतु कांग्रेसनेही मतदानाच्या दिवसांपर्यंत प्रचार आणि व्यवस्थापनात जोरदार उसळी मारत निवडणुकीची रंगत वाढवतानाच भाजपला हवालदिलीचा अनुभव आणून दिला. आदिवासी, दलित, मुस्लीम यावेळी मोठ्या प्रमाणात कांग्रेस कडे झुकले तर ओबीसींची मतं सुद्धा आपल्याकडे वळवण्यात कांग्रेस आघाडीला काहीसे यश आले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लक्ष १७ हजार ७०२ मतदार आहेत. यापैकी ११ लक्ष ६२ हजार ४३४ (७१.८८ टक्के) मतदारांनी मतदान केले. भाजपचा लोकसभेतील प्रभाव बघता नेतेंकडे ५ लक्ष ५० हजार मतदार हे त्यांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून मिळणे निश्चित मानले जात आहे. तर कांग्रेसचे नेते सुद्धा ५ लाख ५० हजारांच्यावर असल्याचे सांगत आहेत. ११ लक्ष ६२ हजार ४३४ मतदानात भाजप आणि काँग्रेस या दोघांची गोळाबेरीज ही ११ लक्ष होते. त्यामुळे उर्वरित ६२ हजार ४३४ मतदार हे उरलेल्या आठ उमेदवारांकडे जाउन जेवढे शिल्लक राहतील आणि ही मतं भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही किती पडतील यावर त्यांचा विजय निश्चित होणार आहे.
उर्वरित आठ उमेदवारांमध्ये वंचित बहूजन आघाडी, बीआरएसपी,  शेकाप समर्थित अपक्ष हे मैदानात दिसून आले. त्यामुळे त्यांचेसह इतरांनी उरलेल्या ६० हजार ४३४ मतांपैकी ४० ते ५० हजार मतं जर त्यांनी घेतली तर भाजप किंवा काँग्रेस च्या निवडून येणाऱ्या उमेदवाराची लीड ही पाच ते दहा हजार मतांमध्ये असेल. एवढेच सांगता येईल. बाकी ४ जून रोजी दुपार पर्यंत स्थिती स्पष्ट होईल.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!