धानखरेदीत ६ कोटींचा गैरव्यवहार प्रकरणात आणखी एका कर्मचाऱ्यास अटक
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ८ जून
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या धान खरेदीत ६ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका कर्मचाऱ्यास अटक केली आहे. राकेश सहदेव मडावी (वय ३४), असे संशयीत आरोपीचे नाव असून, तो महामंडळाच्या घोट येथील कार्यालयात विपणन निरीक्षक पदावर कार्यरत आहे.
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) येथील धान खरेदी केंद्रावर पणन हंगाम २०२२-२३ मध्ये धान आणि बारदाणा खरेदीत ६ कोटी २ लाख ९३ हजार ८४५ रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ६ जूनला आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार आणि मार्कंडा (कं) खरेदी केंद्राचे तत्कालिन केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्ले यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीअंती अपहारात विपणन निरीक्षक राकेश मडावीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही काल (ता.७) अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, उपनिरीक्षक सरिता मरकाम, बालाजी सोनुने यांनी ही कारवाई केली.