तोडगट्टा आंदोलकांना पोलिसांकडून अमानुष मारहाण ; आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा मानस
अनेक पुरुष पोलीस जवानांनी महिला आंदोलकांना लाथाबुक्क्यांनी तुडवले

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क/ ग्राउंड रिपोर्ट / हेमंत डोर्लीकर / रेकामेटला
२० नोव्हेंबरच्या सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास अचानक जवळजवळ ५०० च्या संख्येने आलेल्या पोलीसांनी आंदोलनस्थळ ताब्यात घेऊन प्रातर्विधी आणि मुखमार्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आंदोलनकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अडवले आणि आंदोलन सोडून जाण्यासाठी सांगितले. लोकांनी प्रश्न उपस्थित करताच मारहाण सुरू केली,मंडपाची तोडफोड केली. पोलिसांच्या संपूर्ण ताफ्यात केवळ तीन चारच महिला पोलिस होत्या. पुरुष पोलीसांनी आंदोलनस्थळावरील महिलांना लाथाबुक्क्यांनी तुडवले असल्याचे रेकामेटला येथील नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
त्यामुळे आंदोलन चिरडण्यासाठीच पोलीसांनी बळाचा वापर केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साधारणपणे ११ वाजताच्या सुमारास पोलीसांचे हेलिकॉप्टर उतरले. त्यात ९ प्रमुख नेत्यांना मारहाण करीत हेलिकॉप्टरमध्ये कोंबले आणि इतरांना वेगवेगळ्या वाहनात जबरदस्तीने टाकून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. एका महिलेला तर वाहनात टाकल्यानंतर पोलीस जवानाने बुटाने लाथ घालून आत ढकलले. त्यामुळे तोडगट्टा परिसरात पोलीसांविषयी तीव्र असंतोष पहायला मिळाला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आंदोलन थांबणार नाही. परंतु विस्कळीत झालेली स्थिती पुन्हा एकदा स्थिरस्थावर झाल्यावर, अटकेत असलेले २१ प्रमुख कार्यकर्ते सुटून आल्यावर जिल्हाभरातील खदान विरोधी जनआंदोलनाचे प्रमुख, जिल्ह्यातील विविध इलाक्यांचे प्रतिनिधी आणि आंदोलनाला सातत्याने सहकार्य करणारे राजकीय पक्षाचे नेते. सर्वांच्या सामुहिक चर्चेतून पुढील रणनीती ठरवली जाईल.
न्यायालयाने पोलिसांना फटकारले !
पोलिसांनी अटक केलेल्या २१ आरोपींना अहेरी उपजिल्हा न्यायालयात २१ तारखेला हजर करुन त्यांची पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने पोलिसांना फटकार लावताना विचारले की आंदोलक पोलीसांवर धावून आल्याचे काहीतरी पुरावे आहेत काय? वांगेतुरी पोलीस स्टेशन च्या उद्घाटनासाठी तोडगट्ट्यावरुन जाण्याची काय गरज होती? २५० दिवस ज्या आंदोलनाला गालबोट लागले नाही. ते आंदोलक पोलीस पोहोचल्यानंतर कसे बिथरले. आपण कायद्याचे खरेच रक्षक आहात काय? असा थेट प्रश्न न्यायाधिशांनी विचात पोलीस कोठडी नामंजूर करीत न्यायालयीन कोठडी मंजूर केली.