सलग दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिरोंचा पाण्याखाली तर पर्लकोटा नदीला तिसऱ्यांदा पूर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २३ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत शुक्रवारी व शनिवारी जिल्हाभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा नदी, नाले ओसंडून वाहत असून, शेतांमध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरले आहे. मुसळधार पावसाने सिरोंचा पुन्हा पाण्याखाली गेला असून पर्लकोटा नदीला तिसऱ्यांदा पूर आल्याने आलापल्ली-भामरागड या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. दरम्यान चामोर्शी तालुक्यातील अनेक मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत. दोन शेतकरी पुरात अडकले होते. काही तासांनंतर ते सुखरूप बाहेर पडले.
मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४६.२ मि.मी. पाऊस पडला असून १ जून ते २३ जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या १७३.९ टक्के म्हणजेच ९१९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९६.१ मिलीमीटर पाऊस चामोर्शी तालुक्यात पडला. तसेच गडचिरोली तालुक्यात ६८.१ मिमी, आरमोरी ६०.२ मिमी, कुरखेडा ३०.४ मिमी, सिरोंचा २७.९ मिमी, अहेरी ३९.५ मिमी, एटापल्ली ३३.८ मिमी, धानोरा ३५.७ मिमी, कोरची ६.५ मिमी, देसाईगंज ५१.१ मिमी, मुलचेरा ६१ मिमी व भामरागड तालुक्यात ४३.८ मिमी पाऊस पडला.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत शुक्रवारी व शनिवारी गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागात जोरदार पाऊस पडला. यामुळे नदी नाले तुडुंब भरले असून सिरोंचा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. तसेच पर्लकोटा नदीला तिसऱ्यांदा पूर आल्याने आलापल्ली-भामरागड या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली असून चामोर्शी तालुक्यातील कोनसरी-जामगिरी, हरणघाट-चामोर्शी, भेंडाळा-गणपूर, तळोधी-आमगाव, चामोर्शी-मार्कंडादेव मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरून वाहतूक ठप्प झाली आहे.
गेले दहा दिवस गडचिरोली शहर जिल्ह्यात प्रचंड पावसाने पुराची स्थिती होती. दक्षिण गडचिरोलीत केले दहा दिवस पुराने हाहाकार माजविला. शेती- घरे- सार्वजनिक मूलभूत सोयीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे कर्जत जामखेड्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दक्षिण गडचिरोलीत पूर पिडीतांसाठी मोठी रसद पाठवली असून त्याचे वितरण सुरु आहे. उल्लेखनीय आहे की कोविड काळातही आमदार रोहित पवारांनी गडचिरोलीत मोठी मदत केली होती. यांसह खासदार अशोक नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी, भाजप व अनेक संघटनांच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत कार्य सुरु आहे.
पुरातून दोन शेतकरी सुखरूप बाहेर
जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा नदी, नाले ओसंडून वाहत असून, शेतांमध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरले आहे. शनिवारी सकाळी येनापूर येथील शेतकरी मनोहर राऊत आणि त्यांचा मुलगा संदीप राऊत हे भात रोवणीसाठी शेतावर गेले होते. परंतु मुसळधार पाऊस पडल्याने अल्पावधीत शेते तुडुंब भरली. यामुळे दोघांनाही गावाकडे येणे शक्य झाले नाही. त्यांनी उंच भागावर आश्रय घेतला. काही तासांनंतर ते सुखरूप बाहेर पडले.