आपला जिल्हा

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा – रवी जंगल परिसरातील घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २३ जुलै

वडसा देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा – रवी जंगल परिसरात शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रस्त्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. शेतीचे काम आटपून आपल्या घराकडे परत जात असताना सदर घटना घडली. गवळीदास तिमाजी गुरनुले (४९) कोंढाळा असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने रोजच्या प्रमाणे शेतीचे काम सकाळीच आटोपून शेतकरी सायकलने घराकडे जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक शेतकऱ्यावर झडप घातली. त्यात ते गंभीर जखमी झाले. वाघाने त्यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर पंजाने वार करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल के. वाय. कऱ्हाडे, वनरक्षक सलीम सय्यद यांनी जखमी शेतकऱ्याची भेट घेतली. शेतकऱ्याला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सध्या भातरोवणीचे कामे जोरात सुरू असल्याने वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे ही मागणी जोर धरू लागली आहे.

वाघाच्या तावडीतून सुटकेसाठी सायकला बनवले शस्त्र

गवळीदास सायकलने घराकडे जात असताना वाघाने हल्ला चढविला. यात गवळीदास खाली कोसळला. मात्र गवळीदासने न डगमगता आपल्या जवळ असलेल्या सायकलाच आपले शस्त्र बनवले व सायकल वाघाच्या दिशेने भिरकावली. वाघाला सायकल लागताच तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. त्यामुळे गवळीदास गंभीर जखमी झाला असला तरी वाघाच्या तावडीतून बालबाल बचावला आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!