आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

गडचिरोलीत माओवाद्यांकडून एकाची हत्या,राष्ट्रीय महामार्गावर टाकला मृतदेह

पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २९ मार्च

पोलिसांचा खबऱ्या असल्याचे सांगत माओवाद्यांनी एका आदिवासी इसमाची हत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अशोक तलांडे (रा.दामरंचा,ता.अहेरी) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून या घटनेने ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील ताडगाव वरून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर अशोक तलांडे यांचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे मृतदेहाजवळ काही पत्रके आढळून आले असून त्यात अशोक हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अशोक तलांडे याला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती.त्याच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना सुद्धा सुधारण्यास सांगण्यात आले.मात्र तो सुधारला नाही. त्यामुळे जन अदालत मध्ये त्याला शिक्षा देण्यात आली असून याला एक ठाणेदार  जबाबदार असल्याचा उल्लेख देखील त्या पत्रकात करण्यात आला आहे.

अशोक तलांडे हा मूळचा दामरंचा येथील रहिवासी असला तरी तो मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नी सोबत भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात राहत होता.अशोक हा अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती केव्हा पासून घरून बेपत्ता आहे याची माहिती कळू शकली नाही.मात्र, अशोक हा पोलिस खबरी नसल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले आहे. या घटनेचा तपास ताडगाव पोलीस करीत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण झाली आहे.

घटनास्थळी आढळले पत्रक
माओवादी कोऱ्या कागदावर लाल रंगाने लिहिलेले पत्रक वापरतात. मात्र, घटनास्थळावर आढळलेले पत्रक हे वहीच्या पानावर लिहिलेले होते.बाल पेनी ने लिहिले पत्रकात खाली पेरमिली एरिया कमिटी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) मार्च २०२४ असा उल्लेख आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!