आपला जिल्हाराजकीय

डॉ. नामदेव उसेंडी यांचा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

कांग्रेसला दुसरे खिंडार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२६ मार्च 

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील तिकीट वाटप समितीने माझेकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून गडचिरोली जिल्ह्याबाहेरील धनदांडग्या माणसाला कांग्रेसची उमेदवारी देऊन जिल्ह्यातील आदिवासी ऊमेदवाराला डावलले त्यामुळे आपण या अन्यायाविरुद्ध  महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहोत. अशी घोषणा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज मंगळवारी त्यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय आहे की चार दिवसांपूर्वी कांग्रेसचे प्रदेश सचिव डॉ नितीन कोडवते दाम्पत्याने कांग्रेसला रामराम करून भाजपचे कमळ हाती घेतले.

पत्रकार परिषदेत उसेंडी म्हणाले की मी महाराष्ट्र
प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो. नेमणूकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी कॉंग्रेस पक्षाचा संघटन करण्याचा प्रयत्न केला कॉंग्रेसच्या माध्यमातुन आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मी गडचिरोली जिल्हयाचा स्थानिक उमेदवार म्हणुन पक्षाकडे गडचिरोली -चिमुर या लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मागितली होती, स्थानिक व राज्य पातळीवरचे माझा काम पाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतू स्थानिक व राज्य पातळीच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लोकसभा क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीला गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी दिली.
घटनेच्या तरतुदीनुसार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे स्थानिक आदिवासींची लोकसंख्या गृहीत धरुन या भागातील प्रश्न व समस्या लोकसभेत मांडून सोडविले जातील, हा उद्देश होता, अशी संकल्पना
दृष्टीस ठेऊन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला होता.
या संकल्पनेला छेद देवून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आपसी गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने स्थानिक नेतृत्वावर अन्याय झालेला आहे. माझ्या सारख्या पक्षासाठी रात्र-दिवस मेहनत करण्या-या कार्यकर्त्याला कॉग्रेसचे स्थानिक व राज्यपातळीवरील नेतृत्व गटबाजीने ग्रस्त असल्यामुळे न्याय देवू शकत नसेल तर या क्षेत्रातील लोकांना न्याय कसा मिळेल या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे असे ते म्हणाले.

उसेंडी यांनी २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा लढवल्या होत्या. परंतू ते अपयशी ठरले. पूढे कांग्रेस ने दोन्ही विधानसभा निवडणुकीत डॉ.उसेंडींना डावलून मतदारसंघाच्या बाहेरच्या उमेदवारांना तिकिट दिले त्यामुळे पक्ष सातत्याने बाहेरच्यांना उमेदवारी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या राजीनाम्याने कांग्रेस पक्षावर काहीही फरक पडणार नसल्याचे त्यांनी उपरोधिकपणे सांगितले. उसेंडी पुढे म्हणाले की कांग्रेस नेत्यांकडून नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु लबाडांच्या आश्वासनांवर आता माझा विश्वास राहिलेला नाही. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत मला आश्वासन देऊन मतदारसंघाबाहेरचे उमेदवार देऊन पक्ष संघटन कमजोर केले. आता जर खरोखरच माझी नाराजी दूर करायची असेल तर लोकसभेचा किंवा आगामी विधानसभेचा एबी फार्म माझेकडे द्यावा. पत्रकार परिषदेला कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार उपस्थित होते. त्यांनी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना विश्वासात न घेणाऱ्या कांग्रेसचा आजच पराभव दिसत असल्याचे म्हटले आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!