ताज्या घडामोडीराजकीय

१२- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात बीआरएसपी व अपक्ष असे दोन नामनिर्देशनपत्र दाखल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २२ मार्च

१२ गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी आवेदनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद गुरुदास मडावी यांनी पक्षाच्या वतीने शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांचेकडे सादर केला. हा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील पहिल्या उमेवाराचा अर्ज होय. त्यानंतर डोमाजी बोरकर या अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. तसेच ८ व्यक्तींनी २९ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण ७५ नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.

भाजप आणि काँग्रेस या प्रमुख तुल्यबळ प्रतिस्पर्धी पक्षांच्या उमेदवारांची अद्याप घोषणाच झालेली नाही. महा विकास आघाडी तथा महायुतीचे उमेदवार वगळता अन्य कोणत्या पक्षाचे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने अर्ज सादर करण्यात बाजी मारली आहे. महाराष्ट्रात छोट्या डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतील पक्षांनी प्रागतिक पक्ष आघाडी तयार केली आहे. त्यांचेही इंडिया आघाडीला समर्थनच आहे. परंतू इंडियातील प्रमुख पक्ष कांग्रेस त्यांना कवडीचीही किंमत किंवा सन्मान देत नाही. त्यामुळे आम्ही फरफटत जाणार नाही अशी भूमिका घेत शुक्रवारी बीआरएसपी चे प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलींद बांबोळे, मार्गदर्शक तथा आघाडीतील शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, उमेदवार विनोद गुरुदास मडावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकशाही विरोधी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीतर्फे कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्याने आणि बहुजन – आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण नसल्याने बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज उभा करण्याच्या विचाराने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षातर्फे गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघा करीता आज युवा नेते विनोद गुरुदास मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांनी म्हटले आहे.

काॅंग्रेस पक्षाने भाजपच्या विरोधात दिलेला उमेदवार प्रभाव नसलेला आणि जिल्ह्याभरातील आदिवासी बहुल भागातील पारंपरिक इलाके व ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनोद मडावी यांच्या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले असून प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील अनेक पक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाला निवडणूकीत प्रत्यक्ष समर्थन देवून प्रचार करण्याची शक्यता असल्याने यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, प्रफुल्ल रायपुरे, महिला शहर अध्यक्ष विद्या वाळके, रेखा कुंभारे, शोभा खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सतिश दुर्गमवार, सरपंच देवीदास मडावी, धनराज दामले, प्रतिभा दामले, प्रकाश मडावी, सुरज ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!