महागड्या फास्टफुडपेक्षा स्वस्त व पौष्टिक रानभाज्यांचा अंगिकार करा – कुलगुरू, डॉ प्रशांत बोकारे
रानभाजी महोत्सव ; तीन दिवस ६० प्रकारच्या रानभाज्यांचा घेता येणार आस्वाद

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०५ ऑगस्ट
महागड्या फास्टफुडपेक्षा स्वस्त व पौष्टिक रानभाज्यांचा अंगिकार करण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले. रानभाज्यांचा व्यावसायिक दृष्टया विचार केल्यास मार्केटींग आणि पुरवठा यामध्ये हजारोंचा रोजगार निर्मिती होवू शकते असेही ते म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारच्या रानभाज्या मिळत असून स्थानिक नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी गडचिरोलीत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या महोत्सवात वेगवेगळया तब्बल ६० प्रकारच्या रानभाज्या नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
पौष्टिक आणि औषधी गुणसंपन्न अशा मौल्यवान रानभाज्यांचे जतन व संवर्धन माहिती तंत्रज्ञानाच्या युगात केले पाहिजे असे प्रतिपादन गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वन विभाग, आत्मा, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, माविम आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली वन वसाहतीमधील शिल्पग्राम प्रकल्प येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर उपस्थित होते. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ.डी.बी.उंदिरवाडे, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोली, आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, उपवनसंरक्षक जमीर शेख, हरवीर सिंग, धनंजय वायभासे उपस्थित होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्र मार्फत रानभाज्यांवरती आधारीत पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक संदीप कऱ्हाळे तर आभार ज्ञानेश्वर ताथोड यांनी मानले.