पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ नोव्हेंबर
आम्ही भारताचे लोक…, संविधान चिरायू होवो, म्हणत गडचिरोली जिल्ह्यातील १२ ही तालुक्यात प्रशासनासह, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संस्था, संघटना, शैक्षणिक संकुल आणि हजारोंच्या संख्येने जागृत नागरिकांनी जिल्हाभर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करीत रॅली आणि सभा,मेळावे यांच्या माध्यमातून देशाच्या संविधानावरील आपला अटूट विश्वास व्यक्त केला आहे.
गडचिरोली शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य सर्वच शासकीय कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करीत संविधान दिन साजरा करण्यात आला. जस्टिस फॉर मुव्हमेंट, संविधान फाउंडेशन, आदिवासी विकास युवा परिषद, जिल्हा माळी समाज संघटना, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जंगोरायताड महिला समिती, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, सोशल एज्युकेशन मुव्हमेन्ट, बामसेफ, नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन,कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, आदिवासी एकता समिती, आदिवासी गोटुल समिती नवेगाव (मूरखळा), प्रबुद्ध विचार मंच, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक असोसिएशन, सत्यशोधक फॉउंडेशन याचे वतीने संविधान जागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात शहरातील महत्त्वाच्या चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. शेवटी जिल्हापरिषद हायस्कूलच्या सभागृहात सभेने रॅलीची सांगता झाली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष शिवसेना, आम आदमी पार्टी यांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यालयात संविधान दिवस साजरा केला. अहेरी, चामोर्शी, आरमोरी वडसा कोरची तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले गेले.