
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२२ फेब्रु.
अवाढव्य ‘बिलो’ रकमेच्या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी भारतीय जनसंसदेने बुधवारी गडचिरोली शहरातील गांधी चौकात धरणे आंदोलन केले. या सर्व कामांची उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास भविष्यात मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी दिला आहे.
विरोधात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य समिती विश्वस्त डॉ शिवनाथ कुंभारे सदस्य अविनाश आंबेकर भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष विठ्ठलजी बदखल, क्रिष्णाजी झंजाळ, धनपालजी कार यांचे नेतृत्वात हे धरने आंदोलन करण्यात आले.
सरकार विविध योजनांच्या माध्यमातुन विकासात्मक योजना राबवित आहे. परंतु विकासाच्या नावावर साखळी पध्दतीने लुट होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत कंत्राटदारा कडुन सन २०२० ते २०२४ पर्यंतचे ३५ ते ६८ टक्के पर्यंतचे बिलो स्वरुपातील रस्ते, पुल, डांबरीकरन, मजूर, बेरोजगार सोसायटी मार्फत केलेली कामे, आर. आर. पिटसह अन्य कामे अंदाजपत्रक डावलुन कंत्राटदारांना दिली असून ती कामे अत्यंत निकृष्ट व बोगस झालेली असुन अनेक बांधकामावर कामांचे फलक लावलेले नाहीत. अनेक कामावर अंदाजपत्रकात दाखविलेली थिकनेस दिसुन येत नाही. मंजुर कामावर अनेक ठिकाणी साईड बंब चा भरणा केलेला नाही. अत्यंत हलक्या प्रतिचा डांबर वापरुन शासनाची व जनतेची दिशाभुल केली जात आहे. एकीकडे ३५ ते ६८ टक्के बिलोची ( कमी किंमतीत) रक्कम दाखवायची तर दुसरीकडे सदर बिलोची रक्कम शासनाकडे परत न करता त्यावर वाढीव काम दाखवुन अनेक कामावरील रक्कम हडप केली आहे. सोसायटी मार्फत केलेली कामे, दुरुस्तीची कामे, आर. आर. पिटची कामे अंदाजपत्रक डावलुन करीत असल्याचा आरोप भारतीय जनसंसदेने करीत सदर कामांची चौकशी करण्या संदर्भात शासन, प्रशासनास मागील वर्षभरापासुन अनेकदा पत्रव्यवहार
करुनही चौकशी झाली नाही. मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठांना तक्रारी केल्या नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री व सचिव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नागपुर प्रादेशिक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या दबावात चौकशी दडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाही आरोप भारतीय जनसंसदेने धरणे आंदोलनादरम्यान केला आहे. या सर्व कामांची उच्चस्तरीय पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.