गडचिरोली पोलिसांनी प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले २ किलो स्फोटक साहीत्य केले नष्ट.
माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१९ फेब्रु.
गडचिरोली पोलिसांनी प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले २ किलो स्फोटक साहीत्य केले नष्ट करीत माओवादयांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे.
सोमवारी कुरखेडा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या पोस्टे कोटगुल पासुन ५०० मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणाया पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकांला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे अशी गोपनिय खात्रीशीर माहिती प्रभारी अधिकारी कोटगुल धनंजय कुलकर्णी यांना मिळाल्यावरुन बीडीडीएस पथकाच्या मदतीने स्फोटक नष्ट करण्यात आले.
बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग केली असता, एक संशयित जागा दिसल्याने घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिड ते दोन फुट खोल जमीनीमध्ये स्फोटक पदार्थ भरुन असलेले प्रेशर कुकर सापडले. बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे २ किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने हे स्फोटक पदार्थ घटनास्थळावरचं नष्ट करण्यात आले.
सदर कारवाई रविंद्र भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी,कुरखेडा यांच्या नेतृत्वात पोस्टे कोटगुलचेे प्रभारी धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी मयुर पवार, हवालदार पंकज हुलके, अनंतराव सोयाम, अंमलदार संचिन लांजेवार व चालक तिम्मा गुरनुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले.