दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने ठेकेदाराच्या सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन
गडचिरोली शहरात स्वच्छतेचा उडाला बोजवारा नप प्रशासन तोडगा काढण्यात अयशस्वी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १६ जानेवारी
गडचिरोली नगरपरिषदेतील सफाई कंत्राटदाराने सफाई कामगारांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने सफाई कामगारांनी शुक्रवारी रात्री पासून कंत्राटदाराचे विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. चार दिवस उलटूनही यावर तोडगा काढण्यात नगरपरिषद प्रशासन असफल ठरल्यामुळे आगामी काळात शहरात आरोग्याचे मोठे संकट उभे ठाकण्याची चिन्ह दिसत आहेत.
सदर कंत्राट हे अमरावती येथील दिपक ऊत्तराणी यांना दिले असून सतिश जवादी हे त्याचे नियंत्रक म्हणून काम पाहतात. या कंत्राटदाराने सफाई कामगारांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. परिणामी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिक माहिती घेतली असता कंत्राटदाराला नगरपरिषदेकडून मागील पाच महिन्यांपासून कामाचे पैसे दिले गेले नाहीत. असे असताना कंत्राटदाराने कामगारांचे तीन महिने वेतन दिले. आता नगरपरिषदेकडून पैसे मिळाल्याशिवाय कामगारांचे वेतन करणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. नगरपरिषदेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वच्छतेचा हा निधी १५ व्या वित्त आयोगाच्या लेखाशिर्षातून प्राप्त होतो. राज्य सरकार कडून सदर निधीचे आवंटन झाले नसल्याने नगरपरिषद कंत्राटदाराला आणि कंत्राटदार कामगारांना वेतन देऊ शकत नाही. असा हा द्रविडी प्राणायाम आहे. परिणामी कामगारांनी कामबंद आंदोलन केल्यानंतर शहरातील नाल्या तुंबल्या, जागोजागी कचऱ्याचे ढीग उभे व्हायला लागले, रविवारच्या आठवडी बाजारातील भाजीपाल्याचे वेस्ट तसेच पडून राहिले आहे. या आठवड्यातही यावर तोडगा निघण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शहरात आरोग्याचे गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची लक्षणे दिसून येत आहेत.
तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीअभावी ही समस्या थोड्या कालावधीसाठी उत्पन्न झाली असून तिच्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नप प्रशासनाने कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. कामगारांना सुध्दा वस्तुस्थिती सांगितली गेली आहे. आगामी दोन दिवसांत स्वच्छतेचे काम पूर्ववत सुरू करण्यात येईल.
सुजित खामनकर उप अभियंता तथा संनियंत्रण अधिकारी स्वच्छता विभाग, न. प. गडचिरोली