महिला सक्षमीकरण कार्यक्रमात महिलांचीच आबाळ, नियोजन ढिसाळ
अनेकांना भोजन पास मिळाले नाहीत. तर पास मिळूनही अनेक महिलांना भोजन मिळाले नाही.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ जानेवारी
सकाळी दहा वाजता पासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना अन्न व पाण्यासाठी धावाधाव करावी लागल्याने महिला सशक्तीकरण अभियानाच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी गडचिरोलीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात झाली असून कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिरा पोहोचले. त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या महिलांचे हाल झालेले पाहायला मिळाले. बाळासह आलेल्या महिलांचे तर अधिकच हाल झाले. अनेकांना भोजन पास मिळाले नाहीत. तर पास मिळूनही अनेक महिलांना भोजन मिळाले नाही.
मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. चारशे बस, शेकडो खासगी वाहनांतून जवळजवळ २५ हजार महिलांना ९ जानेवारी रोजी शहरातील एमआयडीसी परिसरातील कोटगल रोड मैदानावर एकाच छताखाली एकत्रित आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात गडचिरोली येथून झाली. यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिलांना एकत्रित आणण्यात आले. मात्र, हजारोंच्या गर्दीत प्रशासनाचे नियोजन कोलमडले.
सकाळी ११ वाजताच्या नियोजित कार्यक्रमासाठी १० वाजेपासून गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत मान्यवरांचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे महिला- विद्यार्थी ताटकळून गेले होते. पाण्यासाठी महिला, विद्यार्थी आसन सोडून धावाधाव करताना दिसून आले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमविण्यासाठी प्रशासनातील प्रमुखांनी तालुकास्तरावरील यंत्रणेला ‘टार्गेट’ दिले होते, अशी चर्चा असतानाच ढिसाळ नियोजनामुळे आबाळ झालेल्या अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली.
सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांकडून अडवणूक
दरम्यान, कार्यक्रमस्थळी प्रवेश देताना पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली अडवणूक केल्याचे दिसून आले. अनेक महिलांच्या पर्समधील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. शाई फेकीच्या घटनांच्या धास्तीने अनेक जणांकडून पेनदेखील काढून घेतले. काही महिला लहानग्यांना घेऊन आल्या होत्या, त्यांचेही हाल झाले.