टिटोळा येथील पोलीस पाटील लालसु वेळदा यांचे हत्येच्या आरोपीस अटक
अर्जून हिचामी हा नक्षलवाद्यांच्या जनमिलिशियाचा सदस्य असल्याचा पोलिसांचा दावा. दीड लाखांचे बक्षीसही घोषित

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१० डिसेंबर
गडचिरोली जिल्ह्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसु वेळदायांचे हत्येचा आरोपी नक्षलवाद्यांच्या जनमिलिशियाचा सदस्य अर्जुन सम्मा हिचामी, (१९) रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि.गडचिरोली हा गटटा (जांभिया.) हददीत गटटा नाल्याजवळ पोलीसांच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथक सी -६० चे जवान आणि गटटा (जांभिया.) पोलीस पार्टीच्या जवानांनी नक्षल विरोधी अभियान राबवून त्यास काल ९ डिसेंबर रोजी अटक केली आहे.
अधिक तपासात असे आढळून आले की, टिटोळा गावातील पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. हे उघड झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टे गटटा (जांभिया.), हेडरी,आणि सुरजागड भागातील सुरक्षा जवानांच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवुन होता. तसेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धात व मार्च महिन्याच्या सुरुवातीला विसामुंडी आणि अलेंगा येथील बांधकाम उपकरणांच्या जाळपोळ प्रकरणातही त्याचा सक्रीय सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याला ७६/२०२३ कलम ३०२,३६ डॉ ४,१४३,१४७,१४८,१४९,१२० ब भादंवि ३/२५ भारतीय हत्यार कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अशा गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. तो टिटोळा ता.एटापल्ली जि.गडचिरोली येथील पोलीस पाटलाच्या हत्येमघ्ये अटक करण्यात आलेला पहिला आरोपी आहे.
अर्जुन सम्मा हिचामी हा २०२१ पासुन झारेवाडा आणि आजुबाजुच्या भागात कार्यरत जनमिलीशिया म्हणुन सक्रीय होता. येत्या काही दिवसात पेरमिली दलम सदस्य होण्याची त्याची योजना होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये विसामुंडी गावातील जाळपोळी मध्ये, मार्च २०२३ मध्ये झालेल्या अलेंगा-पुरसाळगोंडी गावात झालेल्या जाळपोळी मध्ये नोव्हेंबर २०२३ रोजी टिटोळा गावातील पोलीस पाटील लालसु टिंगरा वेळदाच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने अर्जुन सम्मा हिचामी याच्या अटकेवर दिड लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७६ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.