रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट
आरमोरीच्या पाच तरुणांवर गुन्हा दाखल; चौघांना अटक, एक फरार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ नोव्हेंबर
रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे आरमोरी येथील तरुणांच्या अंगलट आले आहे. आरमोरी पोलिसांनी या तरुणांना रात्री सामाजिक शांतता भंग करताना जेरबंद गुन्हा दाखल करत कोठडीत वाढदिवसाचा आनंद दिला.
शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडचिरोली पोलिस गस्त घालत होते. आरमोरी शहरातील रामाळा मार्गावर २५ नोव्हेंबरच्या रात्री ११:३० ते १२: ३० दरम्यान काही तरुण गोंधळ करत असल्याचे दिसल्याने त्यांच्या जवळ जावून चौकशी केली असता गाडीच्या सीटवर केक ठेवून तो तलवारीने कापत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तरुणांकडून तलवार, दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. लोकेश विनोद बोटकावार वय २१, लोकमित्र खुशाल ठाकरे वय २५, बादल राजेंद्र भोयर वय २३, पवन मनोहर ठाकरे, वय २५ वर्षे व राहुल मनोहर नागापुरे वय २८ वर्षे सर्व रा. बाजारटोली आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील राहुल नागापुरे पळून जाण्यात यशस्वी झाला तर चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष कडाळे करत आहेत.