आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात तीन अपघातात दोघांचा मृत्यू, तर तीन जखमी

विजेचे बल्ब लावताना युवकाचा मृत्यू, दोन मोटरसायकलींच्या धडकेत एक ठार, दोन जखमी लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिली धडक, दुचाकीस्वार गंभीर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२६ नोव्हेंबर 

गडचिरोली जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाले तर तीन जखमी झाले.

घोट- चामोर्शी मार्गावर २६ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता दोन मोटार सायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. नित्यानंद बिश्वास वय ६० रा. गोविंदपूर ता. मुलचेरा असे चामोर्शी तालुक्यातील अपघातातील मृताचे नाव असून अशोक नारायण खोब्रागडे वय ५० रा. माडे मुधोली टोला ता. चामोशी, कल्पना शेखर बेपारी वय ४५ रा. विक्रमपूर ता. चामोर्शी हे जखमी झाले. बिश्वास हे शेतकरी होते तर खोब्रागडे हे मकेपल्ली ता. चामोर्शी येथील जि.प. शाळेत शिक्षक आहेत. बिश्वास हे दुचाकीवरुन (एमएच ३३ पी- ४८९१) चामोर्शीवरून घोटकडे येत होते तर खोब्रागडे हे दुचाकी क्रमांक एमएच ३३ एच- ८९४७ ने घोटहून चामोर्शीला जात होते. त्यांच्या मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी नितेश गोहणे यांनी घोट पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांना घटनास्थळी पाठवले. जखमींना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अशोक खोब्रागडे गंभीर जखमी असून कल्पना बेपारी या किरकोळ जखमी आहेत. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुसरी घटना चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे घडली. अनखोडा येथे ग्रामपंचायतीचे पथदिवे लावताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा करुण अंत झाला. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृताचे नाव रामकृष्ण आबाजी नायगमकार वय २६ रा. अनखोडा असे आहे. अनखोडा ग्रामपंचायतीचे शिपायी दिलखूश बबन निमरड यांनी रामकृष्ण नायगमकार यांच्या घरी जाऊन ग्रामपंचायतीचे गावातील पथदिवे लावायचे आहेत तर तुला मजुरी मिळेल म्हणून त्याला बोलावून नेले. वीज वितरण कंपनीला न सांगता गावातील एक ट्रॉन्सफार्मर बंद केला व समाज मंदिरांच्या मागील रोडवरील पथदिवे लावायला सांगितले. रामकृष्ण हा खांबावर चढून बल्ब लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला व तो तारालाच लटकून राहिला व काही वेळाने तो खाली पडला. घटनेनंतर दिलखूश निमरड घाबरून पळून गेला. ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर ग्रामपंचायत पदाधिकारी हात झटकताना दिसून येत आहेत मात्र ग्रामस्थांनी मृताच्या कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. मृत एकुलता एक मुलगा होता. तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस करत आहेत.
तिसऱ्या घटनेत आष्टी आलापल्ली रोडवरील मार्कंडा कंन्सोबा गावाजवळील वन विकास महामंडळाच्या डेपो जवळ अज्ञात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण गंभीररीत्या जखमी झाला. गंभीर जखमी केवल विजय लोणारे वय २५ वर्ष राहणार मार्कंडा कंन्सोबा हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३३ एएफ ७६१६ ने आष्टीवरुन गावाकडे जात असताना वन विकास महामंडळाच्या डेपो जवळ आल्लापल्ली कडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास जबर धडक दिली. ट्रक चालक घटनास्थळावरून रात्रीचा फायदा घेत ट्रक घेऊन पसार झाला. मार्कंडा कंन्सोबा येथीलच प्रशांत लोणारे त्याच्या मागे येत असताना केवल विजय लोणारे हा जखमी अवस्थेत दिसल्याने त्याने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!