आपला जिल्हा

पुरेशी बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांचे बस स्थानकावर आंदोलन

अभाविपचा पुढाकार

गडचिरोलीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांतील आवागमनासाठी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात बसेस उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हकनाहक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी परीक्षेला मुकावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बससेवा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात गडचिरोली बस स्थानकावर तीव्र आंदोलन केले.

गडचिरोली बस डेपो मध्ये मानव विकास मिशनच्या केवळ सात बसेस आहेत. त्या चामोर्शी,  धानोरा, आरमोरी, सावली एवढ्या प्रदीर्घ क्षेत्रासाठी अपुऱ्या पडतात. इतर सर्वसाधारण आणि जलद, अतिजलद बसेस कित्येकदा विद्यार्थ्यांची संख्या बघून न थांबताच पूढे निघून जातात. हा प्रकार गडचिरोली – चामोर्शी मार्गावर अधिक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान केला आहे. गडचिरोली डेपो परिसरातील अनेक गावांमध्ये अजूही बस सेवा पुरविली जात नाही. कटेझरी, कारवाफा, खुटगाव, रानमुल ,कुंभी या भागातील विद्यार्थ्यांना बसेस अभावी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आगारातील अनेक बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी अनेकदा राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भेटून विद्यार्थी आणि शिक्षकांनी निवेदने दिली. परंतू शालेय सत्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत संबंधित प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे बुधवारी आगार प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले. आंदोलन चिघळू नये म्हणून पोलीसांना पाचारण केले गेले. शेवटी गडचिरोली ठाणेदाराच्या मध्यस्थीने आणि आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन समाप्त केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!