आपला जिल्हा

सुरजागडच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला तिघांचा बळी

एक गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२५ सप्टेंबर 

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने तहसील कार्यालयासमोरील वळणावर दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांत आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे.

प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. तर नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी असल्याचे कळते.

मार्कंडादेव (ता. चामोर्शी) येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) गावी जाण्यासाठी निघाले. याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सीजी ०८एयू- ९०४५) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. दुचाकी समोरील चाकाखाली सापडल्या नंतर १० ते १५ फूट फरफटत गेली. यात रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

२० दिवसांत कुटुंबावर दुसरा आघात
अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या रुद्र याचे वडील गणेश जनध्यालवार यांचा २० दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. या दु:खातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे
जनध्यालवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.
सुरजागड वाहतूकीविरोधात जनाक्रोश
दरम्यान, अपघातानंतर चालकाने वाहन तेथेच सोडून पोबारा केला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकमध्ये फसलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
स्थानिकांनी सूरजागड लोह खनिज वाहतुकीविरुध्द तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पो.नि.विजयानंद पाटील यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ट्रकखालून काढून रुग्णालयात पाठवले
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!