आपला जिल्हाताज्या घडामोडी

नारीशक्ती वंदन विधेयक पारित होणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे यश : खा. नेते

यामुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातही आमदार-खासदार म्हणून महिलांना संधी मिळू शकेल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ सप्टेंबर 

देशाच्या  राजकीय इतिहासात मागील ६० वर्षांपासून महिलांना  त्यांच्या  लोकसंख्येच्या तुलनेत आमदार किंवा खासदार म्हणून संधी मिळाली नाही. पण विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून नारीशक्ती वंदन विधेयक पारित करून महिलांना राजकीय क्षेत्रात ३३ टक्के प्रतिनिधीत्व देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातही आमदार-खासदार म्हणून महिलांना संधी मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.

विश्राम भवनात सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी महिला विधेयकामुळे होणाऱ्या भविष्यकालीन राजकीय, सामाजिक परिवर्तनाची माहिती दिली. महिलांच्या सन्मानासाठी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल यापूर्वी कोणत्याच सरकारला उचलता आले नसल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील विशेष अधिवेशनात झालेल्या या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होतो याचा अभिमान असल्याचे यावेळी खा.नेते म्हणाले. या विधेयकामुळे केवळ लोकसभेतच नाही तर सर्व विधानसभांमध्येही ३३ टक्के महिला सदस्य होतील. विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन त्याचे कायद्यात रूपांतर करणे आणि इतर प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे या विधेयकाची अंमलबजावणी २०२९ च्या निवडणुकीपासून होऊ शकेल, असे खा. नेते म्हणाले.

यावेळी त्यांनी सांगितले की आपण जर देशातील संख्येने मोठ्या असलेल्या राज्यातील विधानसभांमधील महिलांची सहभागिता लक्षात घेतली तर ४०३ सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत फक्त ३८ महिला आमदार आहेत जे तेथील महिला लोकसंख्येच्या ८ टक्के आहे. २८८ सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत फक्त ११ महिला आमदार आहेत जे तेथील महिला लोकसंख्येच्या ४ टक्के आहे. २९४ सदस्य संख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत फक्त ३४ महिला आमदार आहेत जे तेथील महिला लोकसंख्येच्या १२ टक्के आहे. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेत फक्त ३४ महिला आमदार आहेत जे तेथील महिला लोकसंख्येच्या १४ टक्के आहे. २३४ सदस्य संख्या असलेल्या तमिळनाडु विधानसभेत केवळ १७ महिला आमदार आहेत. जे राज्यातील महिला लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त ७ टक्के आहेत. २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत फक्त ३ महिला आमदार आहेत. जे राज्यातील महिला लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त १ टक्का आहे. भविष्यात या स्थितीत बदल होऊन निर्णय क्षमतेत ३३ टक्के महिला सहभागी होतील.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी महिला व युवा आघाडीत नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश झाल्याचे यावेळी सांगितले. यावेळी आ.कृष्णा गजबे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे,  किशन नागदेवे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, रविंद्र ओल्लालवार, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, वर्षा शेडमाके यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!