आपला जिल्हाताज्या घडामोडी

उघड्यावर साठविलेल्या धानाची विक्री रद्द करा : जयश्री वेळदा ( जराते) यांची मागणी

सडलेल्या धानाच्या विक्रीतून पुन्हा एक तांदुळ घोटाळा होण्याची शक्यता!

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २५ सप्टेंबर 

उघड्यावर साठवून ठेवलेला आणि तीन पावसाळे व अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजलेला २४ हजार क्विंटल धान गडचिरोलीचे आदिवासी विकास महामंडळ विक्री करणार असून ही विक्री निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राज्याच्या पुरवठा विभागाचे सचिव व जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात जयश्री वेळदा यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याच्या कारणाने जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचे महामंडळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून धानाची खरेदी दरवर्षी मोठ्या प्रमाणात करत असते. शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत मागिल २०२० – २०२१ सालाच्या हंगामात खरेदी केलेला व उघड्यावर साठवूण ठेवलेला २४,०५१.५९ क्विंटल धान विक्री करीता गडचिरोलीच्या प्रादेशिक कार्यालयाने ऑनलाईन बोली करीता निविदा काढलेली आहे. मात्र मागिल साधारणत: अडीच वर्षांपासून सदरचे धान हे उघड्यावर साठविलेले होते. तीन पावसाळे आणि अवकाळी पावसाच्या पाण्यात सदर धान भिजून ते माणसांनाच नव्हे तर जनावरांना तरी खाण्यास योग्य असतील काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पावसात भिजलेला सदरचा धान मातीत पुरुन नष्ट करायचे सोडून सदर द्यानाची विक्री करण्याचे कारण काय आहे? असा प्रश्नही जयश्री वेळदा यांनी उपस्थित केला आहे.

उल्लेखनीय आहे की सदर धानाची विक्री निवीदा काढण्यापूर्वी हे धान माणूस किंवा जनावरांना खाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी  वापरण्यासाठी योग्य आहे काय? हे टीडीसी ने तपासून घेतले नाही. असे धान जर विकले गेले तर या धानापासून तयार होणारा तांदुळ हा सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत दलालांमार्फत मिसळला जाण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या तांदुळ गैरव्यवहाराच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेळोवेळी उघडकीस येत आहेत व सध्या मोठा तांदुळ घोटाळा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सडलेल्या धानाच्या विक्रीतून पुन्हा एक तांदुळ घोटाळा होवून सामान्य जनतेला निकृष्ठ तांदुळ वितरीत केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि जनावरांच्या आरोग्याचा बचाव होण्याच्या दृष्टीने आपण आपल्या स्तरावरुन तातडीने आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने २०२० २०२१ सालाच्या हंगामात खरेदी केलेला व उघड्यावर साठवूण ठेवलेल्या धानाच्या विक्री करीता काढलेली निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला नेत्या जयश्रीताई वेळदा यांनी केली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!